जळगाव : विधानसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदाच जळगाव शहर भाजप कार्यालयात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)  आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)  उपस्थित आहेत. जळगाव जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात भाजप कार्यालयात बैठक होत आहे. या बैठकीत हे दोघे आमने-सामने आले आहेत. त्यामुळे या दोघांच्यात चर्चा होणार का, याचीही उत्सुकता आहे. आपल्याला संपविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केला, असा थेट आरोप खडसे यांनी केला होता. तसेच पक्षाकडे आपल्या विरोधात कारवाई करणाऱ्यांची नावे दिली आहेत. पक्षातील वरिष्ठांनी योग्य ती कारवाई केली जाईल, असे आपल्याला आश्वासन दिले आहे, असे खडसे यांनी मीडियाला याआधी सांगितले आहे. दरम्यान, त्याचवेळी माझा मार्ग मोकळा असेल, असा इशाराही भाजपला दिला आहे. तर दुसरीकडे भाजपने नाशिक, कोल्हापूर जिल्हा परिषदेत आपली सत्ता गमावली आहे. आता भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या जळगाव जिल्हा परिषदेत सत्ता ठिकविण्यासाठी ही बैठक होत असल्याचे सांगितले जात आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, खडसे यांना कोणीतरी चुकीची माहिती त्यामुळे त्यांनी म्हटले असेल. मी निश्चित भाऊंना चुकीची माहिती दिली, त्याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे. केंद्रीय कमिटीने अनेकांची नावे कापली आहेत. त्यामुळे मी काही त्यांच्याविरोधात आहे, हे चुकीचे आहे, असे गिरीश महाजन यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले.  


तर दुसरीकडे पक्षाने मी ज्यांची नावे दिली आहेत. त्यांच्यावर कारवाई केली नाही तर माझा मार्ग मोकळा असेल, असे खडसे यांनी पक्षाला इशारा दिला आहे. खडसे नाराज असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. आज तर त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर आरोप केला आहे. त्याचवेळी ते जळगावमधील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात बैठकीला उपस्थित होते. त्यांनी निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. 


खडसे यांनी स्पष्ट केले आहे की, मी शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि सेनेचे नेतेही माझ्या संपर्कात होते हे खरे आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे.  तसेच एकनाथ खडसे हे त्याआधी राष्ट्रवादीच्याही संपर्कात होते. पक्षाने माझे तिकीट का नाकारले, हे मला कळलेले नाही. पक्षाला माझ्याबाबत कुठलाही आक्षेप नाही, मात्र कोअर कमिटीच्या मिटींगमध्ये देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, मी भाजप सोडू शकतो किंवा जाऊ शकतो असे म्हटले नव्हते, मी संन्यासही घेऊ शकतो, पक्षाने माझ्या मागणीची नोंद घेतली याचे समाधान आहे, असे सांगत आपल्या  विधानावर घुमजाव केले आहे.