जळगाव : खान्देशात ज्यांनी भाजप रुजवला आणि वाढवला असे एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. खडसेंच्या या पक्षबदलाने कसं बदलेल खान्देशातलं राजकारण, याचीच जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. खान्देशात आता भाजपला उतरती कळा लागेल आणि राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील, अशीच चर्चा आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खान्देशातले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे नवे कोरे तडाखेबाज नेतृत्व असणार आहे. खडसेंच्या नेतृत्वात धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यात राष्ट्रवादी आता पाळंमुळे आणखी घट्ट करेल. त्यातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेले अनिल गोटे आणि खडसे यांची जुनी मैत्री आहे. त्यामुळे हे दोघे एकत्र येत भाजपविरोधात राळ उठवतील, अशीच चर्चा आहे. 


 भाजपला येथे बसणार फटका?


जळगाव महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र अनेक नगरसेवक खडसेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेत सत्तांतर होऊ शकते. ग्रामीण भागात सावदा, यावल, भुसावळ नगरपालिकांमध्येही सत्ताबदल होऊ शकतो.
 
दूध फेडरेशन, बाजारसमित्या आणि जिल्हा बँकांमध्ये राष्ट्रवादीची पकड घट्ट होऊ शकते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त एक जागा कमी आहे, त्यामुळे येत्या काळात अविश्वास प्रस्ताव आणून जिल्हा परिषदेतही सत्ता बदल होऊ शकतो. लेवा पाटील समाजाचं मोठे पाठबळ राष्ट्रवादीला मिळेल, अशी चर्चा आहे.  


जळगावात शिवसेनेची तोफ असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांचे खडसेंशी शत्रुत्व सर्वश्रुत आहे. त्यामुळे कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संघर्षही पाहायला मिळू शकतो. पण गुलाबराव पाटील आणि खडसे एकत्र येत भाजपला धोबीपछाडही देऊ शकतात. सध्या तरी गुलाबराव पाटलांनी त्याचीच तयारी केली. गुलाबराव पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्वागत केले आहे.


भाजपवर नाराज कार्यकर्ते खडसे यांच्यासोबत येतील. पण राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते खडसे यांना कितपत साथ देतील, हाही प्रश्न आहे. पण खडसेंच्या राष्ट्रवादीत जाण्याने उत्तर महाराष्ट्रातल्या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग मात्र लागला, हे मात्र निश्चित.