तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन - एकनाथ खडसे
मी भाजपसाठी खास्ता खल्ल्या. काही वेळा लोकांची बोलणीही खाल्लीत. मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्याचे मला काय फळ मिळाले, असा सवाल करत भाजपवर एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली
मुंबई : मी भाजपसाठी खास्ता खल्ल्या. काही वेळा लोकांची बोलणीही खाल्लीत. लोकं आमच्यावर थुंकलेत. तरीही मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्याचे मला काय फळ मिळाले, असा सवाल करत भाजपवर एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली. मी कोणताही घोटाळा केला नाही. भ्रष्ट्राचाराचा आरोप झाला नाही. तरीही मला डावलले गेले. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तुमच्या पाठीमागे ईडी लावली जाईल. त्यावेळी तुम्हा काय करणार, असा सवाल करण्यात येत होता. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विचारले तुम्ही राष्ट्रवादीत येणार आहे का, त्यावेळी ते तुमच्या मागे ईडी लावतील, असे म्हणाले. त्यावेळी मी सांगितले, मी सीडी लावेन, असे रोखठोक मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसे यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.
एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. माझी हयात गेली. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचे, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचे आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केले नाही. आज चार दिवसापूर्वी भाजपमध्ये आले, ते मला सांगू लागले. तुम्ही आमचे सल्लागार आहात. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिले पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचे उत्तर भाजपचे लोक देऊ शकले नाही, असे खडसे यांनी यावेळी सांगितले.
मी का पक्ष सोडला, यावर खसडे यांनी सांगितले की, मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तसेच दिल्लीतूनही सांगण्यात आले तुम्ही राष्ट्रवादीत जा. त्यानंतर मी जळगाव आणि खान्देशच्या विकासासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तोंडावर गोड बोलायचे आणि पाठीमागे कारवाया करत रहायचे हे मी कधी केले नाही, असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला.
मी राजकीय जीवनातून घरी बसण्याचीच तयारी केली होती. भाजपला हेच वाटत होते, कारण मला भाजप तर काही देणार नाही. तिकिट मागितले तर म्हणतात तुम्ही ज्येष्ठ आहे. नाथाभाऊ तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. चार दिवस ज्यांना भाजपात येऊन झाले नाहीत, असे लोक म्हणतात मार्गदर्शन करा. मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता, त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे. म्हणून मी आलो राष्ट्रवादीत आलो. आज राष्ट्रवादीत आल्याने मला माझ्या डोक्यावरचे ओझे हलके झाल्यासारखे वाटते आहे, असेही खडसे म्हणाले.