पंकजाताई पक्ष सोडणार नाही, पण माझा भरवसा धरु नका - खडसे
एकनाथ खडसे यांची फटकेबाजी...
परळी : गोपीनाथ गडावरुन आज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी पक्षातील लोकांना देखील नाव न घेता टोले लगावले. एकनाथ खडसे यांनी यावेळी त्यांच्या व्यथाही मांडल्या. खडसेंनी म्हटलं की, 'तुम्हाला आम्ही किती ही छळलं तरी आम्ही तुमच्यासोबत राहू, असं मी नाही महादेव जानकर म्हणत आहेत. पण ते हे मुंडे साहेब आणि पंकजाताई यांच्या प्रेमापोटी म्हणत आहेत.' 'जनसंघापासून जेव्हा भाजपची स्थापना झाली. तेव्हापासूनची वाटचाल आम्ही पाहिली. आधी शेटजी भटजींचा पक्ष म्हणून हिणवलं जात होतं त्या पक्षाला बहुजनांचा पक्ष बनवण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं.' असं ही त्यांनी म्हटलं.
'भाजपला आज जे स्वरुप दिसतंय. ते मुंडेसाहेबांमुळे झालं आहे. मुंडे साहेबांनी कार्यकर्ता घडवला. मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खूपसलं नाही. बोलायचं तर समोर बोलायचे. हम तो डुबेंगे सनम पर तुमको भी लेकर डुबेंगे असं मुंडे साहेब म्हणाय़चे. पण तसं मी केलं नाही. मुंडे साहेबांची आठवण झाली की रडावसं वाटतं. आज कोण माझ्यामागे आहे?. तुम्ही आहात म्हणून मी लढतोय. सुख-दु:खात मला ज्यांनी घडवलं ते मुंडे साहेब माझ्यासोबत नाहीत. जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ असायचा. पण आज तसं चित्र नाही.
'आम्हाला पाडण्याचं पाप तुम्ही केलं'
'हे राजकीय व्यासपीठ नाही. पंकजाताईंनी सांगितलं १० मिनिटाच्या वर बोलू नका. पक्षावर बोलू नका. पक्ष मला ही प्रिय आहे. पण आज जे पक्षाचं चित्र आहे तर जनतेला मान्य नाही. तु निवडून येशील असं म्हणायचं आणि दुसऱ्याला हात द्यायचा. माझ्यावर आरोप झाले. तसेच मुंडे साहेबांवर झाले होते. आपल्याच लोकांनी आपल्याया उद्धवस्त करण्याचं काम केलं. आम्हाला पाडण्याचं पाप तुम्ही केलं. तर आम्ही काय करायचं सांगा. पंकजाताई पक्ष सोडणार नाही. पण माझा भरवसा धरु नका. पक्षामध्ये राहून जर अशी वागणूक देत असाल तर पक्षाबाहेर राहून कशी वागणूक द्याल. तुम्ही पक्षाबाहेर जा असं चाललं आहे. मुंडे साहेब असते तर मी मुख्यमंत्री झालो असतो.'
फडणवीसांवर टीका
'चंद्रकांतदादांना सुद्धा माहित नाही. मी आभार का मानतो. २३ तारखेला देवेंद्रजींनी शपथ घेतली. मुंडे साहेबांच्या स्मारकाला ५ वर्षापूर्वी मंजुरी दिली होती. मी मंत्री असताना ती जागा मिळवून दिली होती. स्मारक उभं राहिल अशी आशा होती. ५ वर्ष झाले, सरकार गेलं. पुन्हा पुन्हाचं सरकार आलं. तेव्हा २४ तारखेला मुंडे साहेबांच्या स्मारकाला मंजुरी दिली. २५ ला टेंडर पास केलं. पण २६ ला सरकार गेलं.'
पंकजाताई वाघिणी आहे.
'गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं. स्मारकासाठी निधीबाबत बोलताच त्यांनी म्हटलं दिले. मी भ्रष्टाचार केला नाही. हे लोकांना कळालं पण हे मात्र मान्य करत नाहीत. मुंडे साहेब आणि माझ्या जीवनात जसा प्रसंग आला तसा पंकजाताईंच्या जीवनात येऊ नये. नाथाभाऊ आता बाहेर जा. किती अपमान सहन करत आहेत. असं हे जणू सांगत आहेत. पंकजाताई वाघाची मुलगी आहे. वाघिनी आहे. माझ्याकडे भरपूर आहे. पण बोलायला इथे वेळ नाही. म्हणून थांबतोय. अनेक आठवणी आमच्यासोबत आहेत.' असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलं.