जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला रामराम केला. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होत असल्याचे समजात खडसे समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताच्या फार्महाऊसवर कार्यकर्त्यांशी गर्दी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी कार्यकर्त्यांनीही आपणही पक्षाच्या राजीनामा देणार असल्याचे सांगितले. उद्यापासून आम्हीही पक्ष सोडणार असे सांगत नाथाभाऊंवर अन्याय केला गेला. ते जवळपास ५० वर्षे पक्षासाठी झटले. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी मोठे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


महाराष्ट्र भाजपाला उत्तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  


दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. माझी तक्रार फक्त फडणवीसांबाबत, केंद्रीय नेतृत्त्वाबाबत तक्रार नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. रक्षा खडसे भाजप सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी आपले जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असा हल्लाबोल खडसे यांनी केला. आपल्याबाबत खालच्या स्तरावर राजकारण झाल्याचा आरोप खडसे यांनी केला. 


एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ही घोषणा केली. शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खडसेंच्या संपर्कात अनेक आमदार असल्याचा दावाही त्यांनी केला. खडसेंवर पक्षात सातत्याने अन्याय झाल्यामुळे त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचे पाटील यांनी सांगितले. एकनाथ खडसे यांच्या संपर्कात भाजपचे अनेक नेते असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. कोरोना काळात निवडणूक आणि राजकारण टाळण्यासाठी अन्य नेत्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देणार असल्याचे पाटील म्हणाले.