Eknath Khadse Rejoin BJP :  एकनाथ खडसे.. एकेकाळचं भाजपमधलं मोठं नाव... भाजपला गावपातळीवर, तळागाळापर्यंत पोहोचला, त्यात खडसेंचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं...  राज्यातल्या नेतृत्त्वासोबत खटके उडाले.. तेव्हा खडसेंनी भाजपला सोडून शरद पवारांची साथ धरली.. मात्र फक्त 40 महिन्यांमध्येच खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे... भाजपला आणि खडसेंचाही या घरवापसीत काय फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपमधले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. खडसेंसाठी भाजपने पुन्हा दरवाजे उघडले आहेत. तब्बल 40 वर्ष खडसे भाजपात होते.. मात्र राज्यातल्या नेतृत्त्वासोबत खडसेंचे खटके उडाले. पक्षातून साईडलाईन करत असल्याच्या घटना, खडसेंवर झालेले आरोप यामुळे कंटाळून खडसेंनी भाजप सोडत 23 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रवादीची वाट धरली. त्यानंतर राज्यातल्या भाजप नेतृत्त्वावर टीका करण्याची एकही संधी खडसेंनी सोडली नाही..


 खडसेंची घरवापसी होत असली तरी काही नेते मात्र त्यांच्यावर खुष नाहीत.. तर भाजप अधिकृतरित्या जेव्हा खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत कळवेल तेव्हा आम्ही त्यांचं स्वागत करु अशी भूमिका फडणवीसांनी घेतलीय.


खडसेंची घरवापसी आताच का?


खडसेंनी 40 वर्ष भाजपमध्ये काम केलं.. तिथून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले खडसे 40 महिन्यांमध्येच पुन्हा स्वगृही परतत आहेत.. राज्यातल्या काही नेत्यांवरच आरोप करत खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र खडसेंनी कधीही मोदी, शाहा किंवा केंद्रातल्या भाजप नेत्यांवर टीका केली नव्हती.


पक्षातल्या जेष्ठ आणि जुन्या जाणत्या नेत्यांना पुन्हा चुचकारण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात येतायत. पंकजा मुंडेंना बीडमधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय. तसंच खडसेंनाही पुन्हा भाजपात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.. तसंच जळगाव लोकसभेसाठीही भाजपला खडसेंची गरज आहे...


जळगाव हा उत्तर महाराष्ट्रातला महत्त्वाचा असा मतदारसंघ राहिलाय.. जळगाव आणि रावेरमध्ये शिवसेना-भाजप युतीचंच प्राबल्य राहिलंय. जळगाव जिल्ह्याच्या या दोन्ही जागा खडसेंच्या मदतीशिवाय जिंकणं भाजपला थोडं जिकीरीचं होतं.. कारण खडसेंच्या पाठीशी लेवा मराठा समाज आहे.. जळगावमध्ये लेवा मराठा समाजाचं मतदान निर्णायक मानलं जातं.. त्यामुळे खडसेंच्या पाठीशी असलेल्या या व्होटबँकेचा फायदा भाजपकडून घेतला जाऊ शकतो.. जळगाव, रावेर, धुळे, नंदूरबार यासह राज्यातील काही मतदारसंघात खडसेंचा थोडाफार प्रभाव आहे.. त्यासोबतच सुनेला म्हणजेच रक्षा खडसेंना रावेर लोकसभा मतदारसंघात विजयी करण्यासाठी भाजपने पुन्हा खडसेंसाठी दरवाजे उघडले आहेत अशी चर्चा आहे... तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करत जळगावच्या राजकारणावरची आपली पकड नाथाभाऊ कायम ठेवणार का याचा निर्णय काहीच दिवसांत होणार आहे..