राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एखाद्या प्रकरणात त्यांना गुंतवून अटक करण्याचा डावा होता असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसंच 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार फोडण्याचाही डाव होता असं ते 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महाविकास आघाडी सरकार 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची योजना होती. एखाद्या प्रकरणात गुंतवून त्यांना अटक करण्याचा डाव होता. तसंच 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार फोडण्याची योजना आखण्यात आली होती," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


'शिवसेना 16 जागा लढणार'


शिवसेना राज्यातील 16 जागा लढणार आहे. यामध्ये मुंबईतील 3 जागांचा समावेश आहे. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरुन कोणताही वाद नाही. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही 2019 मधील 42 जागांचा रेकॉर्डही यावेळी मोडू असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसंच उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना आपण कोणतीही ऑफर दिली नसल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 


'उद्धव ठाकरेंनीच पवारांना मुख्यमंत्रीपदासाठी नाव सुचवण्यास सांगितलं'


उद्धव ठाकरेंना नेहमीच मुख्यमंत्री व्हायचं होतं. ते त्यांचं स्वप्नच होतं. 2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच त्यांनी आपण सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरेंना पाचही वर्षासाठी मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांना ठाकरे कुटुंबातच मुख्यमंत्रीपद ठेवायचं होतं असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात मी स्पीडब्रेकर ठरत होतो असा दावाही त्यांनी केला आहे.


शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी नाकारलं. याउलट उद्धव ठाकरे यांनी आपल्याला तुम्हाला मुख्यमंत्री करु असं सांगितलं असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. "जेव्हा महाविकास आघाडी सरकार तयार होत होतं, तेव्ही मी मुख्यमंत्री होण्याची आशा असल्याने माझ्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पण नंतर मला शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवलं असल्याचं सांगण्यात आलं. पण शरद पवारांनी नंतर मला स्पष्टीकरण देत शिवसेनेने उद्धव ठाकरेंचं नाव सुचवण्यासाठी लोकांना पाठवलं होतं असं सांगितलं. म्हणजेच उद्धव ठाकरेंचं नाव सुचवण्यासाठी शरद पवारांना त्यांनीच सांगितलं होतं".