Eknath Shinde Press Conference: विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. राज्यात महायुतीचं सरकार आलं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम आहे. यादरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळावर आपण समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं.  "मी मोदींना फोन केला आणि माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुतीचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे.  तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल," असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.


"भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल. जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलं आहे. कोणतीही कोंडी, नाराजी नाही आहे. येथे कोणताही स्पीडब्रेकर नाही. महाविकास आघाडीचा स्पीडब्रेकर आम्ही काढला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह जो काही निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे," असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. 


विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रताप सरनाईक, नरेश म्हस्केही यावेळी उपस्थित होते. "इतक्या मोठ्या प्रमाणता विजय मिळाला हा मोठा आहे. गेल्या अनेक वर्षात इतका मोठा विजय पाहायला मिळालेला नाही. अडीच वर्षात महायुतीने केलेलं काम, लोकांनी दाखवलेला विश्वास याचं हे प्रतीक आहे. महाविकास आघाडीने रखडवलेली कामं, प्रकल्पं पुढे नेण्यात आली. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटेपर्यंत काम करायचे, दोन तीन तास विश्रांतीनंतर पुन्हा सभा असायची. हे सत्र संपूर्ण निवडणुकीत चाललं. मी 80-10 सभा घेतल्या. पायाला भिंगरी लावून मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणारा आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


पुढे त्यांनी सांगितलं की, "मी स्व:तला मुख्यमंत्री न समजता सामान्य व्यक्ती म्हणून काम केलं. यामुळे मला कोणताही अडथळा येत नव्हता. सर्वसामान्यांसाठी महारा्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे असं मी ठरवलं होतं. मी शेतकरी, सामान्य कुटुंबातून आलो आहे. कशाप्रकारे ते काटकसर करायचे हे मी पाहिलं होतं. त्याचवेळी मी संधी मिळाल्यानंतर असे लोक, लाडकी बहीण, ज्येष्ठ, शेतकरी अशा सगळ्यांसाठी काही ना का काही करायचं असं ठरवलं होतं. मला त्या वेदना समजत होत्या. महायुती सरकारच्या माध्यमातून मी सर्वांसाठी काम केलं." 


"आम्ही राज्य पहिल्या क्रमांकावर नेलं याचं समाधान आहे. या निवडणुकीत जो मतांचा वर्षाव झाला तो केवळ जे आम्ही काम केलं, निर्णय घेतले, सकारात्मकता दाखवली त्याचं फळ आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी माझी ओळख निर्माण झाली. सर्व बहिणींनी लक्षात ठेवलं. ही नवी ओळख मला सर्वात मोठी वाटते," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 


"आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. आम्ही लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय ऐतिहासिक आहे. याचं कारण जीव तोडून मेहनत घेतली, निर्णय घेतले. आम्ही घरी बसलो नाही. आम्ही मनापासून काम केलं. मी शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणार आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे महत्त्वाचं आहे," असंही त्यांनी सांगितलं.


"सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य माणसाला काहीतरी मिळावं ही भावना मी पूर्ण केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. दिघे साहेबांचे विचार आमच्याकडे होतं. आम्ही उठाव केला तेव्हा नरेंद्र मोदी, अमित शाह आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अडीच वर्षं त्यांनी मुख्यमंत्रीपद दिलं. प्रत्येक दिवस, क्षणाचा आम्ही जनतेच्या हितासाठी वापरला. पाठबळ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अडीच वर्षांच्या काळात प्रगतीचा वेग वाढण्यामागे राज्य आणि केंद्रातील समविचारी सरकार आहे," असंही ते म्हणाले.