वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : शिंदे गट व भाजप युतीतील सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांना मोठा धक्का दिला आहे. एकनाथ खडसे यांची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता व गेल्या काळातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनाच्या वतीने समिती नियुक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा दूध संघाचे माजी मंत्री माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता तसेच या दूध संघात राबविण्यात आलेली कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व झाल्याची तक्रार शासनाकडे गेली होती. 


मात्र गेल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नव्हती. शिंदे गट व भाजप युती सरकारची स्थापना झाली असून या सरकारने याप्रकरणी पाच जणांची चौकशी समिती नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाताई खडसे अध्यक्ष असलेले संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नियुक्त केले आहे.


विशेष लेखापरीक्षक अध्यक्ष असलेल्या या चौकशी समितीत पाच जणांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव नी.भा.मराळे यांनी दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार नगराज पाटील यांनी दिली आहे.


दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील एकमेव जिल्हा दूध संघ एकनाथ खडसे यांच्या ताब्यात होता. मात्र शिंदे व भाजप युतीतील सरकारने या ठिकाणच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्ती करत तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करत तातडीने प्रशासक नियुक्त केले आहेत. 


त्यामुळे हा एकनाथ खडसे यांना हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. आधीच अनेक चौकशांच्या फेऱ्यात सापडलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणींमध्ये मोठी भर पडणार असल्याचे बोलले जात आहे