मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने भर रस्त्यात एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सोशल (Shivsena UBT) मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 'मिंधे राजवट फक्त गुंडांसाठी'च असं म्हटलं आहे. 'मिंध्यांचे आमदार महेंद्र थोरवे ह्यांचा हा सुरक्षा रक्षक आहे गुंड?' असा सवालही या व्हिडिओसोबत विचारण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शेअर केलेल्या व्हिडिओत आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांचा सुरक्षारक्षक (Bodyguard) एका कार चालकाला मारहाण करताना दिसत आहे. रॉड सारखी एक वस्तू त्याच्या हातात दिसतेय. त्या वस्तूने तो कार चालकाला बेदम मारहाण करतोय. कार चालकाकडून माफी मागण्याचा प्रयत्न होत असतानाही सुरक्षा रक्षक त्याला मारहाण करतोय. व्हिडिओच्या शेवटी सुरक्षा रक्षक फलंदाजी करण्याच्या स्टाईलमध्ये कार चालकाला मारहाण करताना दिसतोय. रस्त्यावर अनेक वाहनांची आणि लोकांची रहदारी दिसतेय. पण कार चालकाला मारहाण करण्यापासून कोणीही वाचवताना दिसत नाहीए.


नेरळमधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचं नाव शिवा असल्याची माहिती समोर आली आहे.



महेंद्र थोरवेंचं स्पष्टीकरण


हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या व्हिडिओशी आपला काहीही संबंध नाही, हा कार्यकर्त्यांचा आपापसातील मतभेद आहे. मारहाण करणारा व्यक्ती आपला सुरक्षारक्षक नसल्याचंही थोरवे यांनी म्हटलं आहे. पण मारहाण करणारा आणि मार खाणारा दोघंही आपल्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याची कबुली थोरवे यांनी दिली आहे.


सुषमा अंधारें यांची टीका


भर रस्त्यात हातात रॉड घेऊन एखाद्याला मारण्याची हिंमत होते, कारण राज्यात कायदा सुव्यवस्थेचा धाकच उरला नाही असा आरोप ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आमच्या पाठिशी आमदार आहे, आमच्या पाठिशी शिंदे आहे, आमच्या पाठिशी भाजप आहे, गृहमंत्री आमचा बाप सागर बंगल्यावर आहे ही जी वाक्य आहेत, ती गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारी आहेत, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.