Uddhav Thackeray Went Against BJP Due To Sharad Pawar: शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या मुद्द्यामुळे फूट पडली त्यासंदर्भात आता शिंदे गटाने एक मोठा खुलासा केला आहे. भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचे ठरले होते. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना एक ऑफर दिल्याने त्यांची मती गुंग झाल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्याचा दावा शिरसाट यांनी शुक्रवारी केला.


तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचे सूत्र ठरले होते," असं शिरसाठ म्हणाले. मात्र भाजपाने दगा केला, पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केल्याचा संदर्भ देत शिरसाठ यांनी हा खुलासा केला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचे सूत्र ठरले होते ही गोष्ट आम्ही नाकारत नाही. भाजपाचे 105 आमदार असल्याने पहिले अडीच वर्ष त्यांचा मुख्यमंत्री असेल असंही ठरलेलं. त्यानंतर अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार होतं. मात्र उद्धव ठाकरेंचा आक्रमकपणा पाहून भाजपाने पहिली अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री होऊ द्या या प्रस्तावाला मान्यता दिली. मात्र या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नाही, असा दावा शिरसाठ यांनी केला.


पवारांनी उद्धव ठाकरेंना काय ऑफर दिली?


शिरसाठ यांनी थेट शरद पवारांचा उल्लेख करत त्यांच्या ऑफरमुळे उद्धव ठाकरेंची नियत खराब झाल्याचा दावा केला आहे. "शरद पवारांनी दिलेल्या प्रस्तावामुळे उद्धव ठकारेंची नियत बदलली. आम्हाला सत्तेची हाव नाही. 5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री होऊ द्या. मात्र आपण भारतीय जनता पार्टीला सत्तेबाहेर ठेवू, अशी ऑफर पवारांनी दिली होती. त्यानंतर सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला," असं शिरसाठ म्हणाले आहेत. "पवारांच्या सांगण्यानुसारच उद्धव ठाकरेंनी भाजपाशी बोलणी टाळली. कोणी कोणत्याही बोलणीसाठी जायचं नाही, असे आदेश त्यांनी आम्हाला दिले होते," असा दावाही शिरसाठ यांनी केला आहे.


नक्की वाचा >> 'सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने...'; ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा


...म्हणून पक्ष फुटला


"सत्तेच्या लालसेमुळे ते काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर गेले. बाळासाहेबांना अशी आघाडी कधीच मान्य झाली नसती. मात्र उद्धव यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यामुळेच पुढे पक्षात फूट पडली," असंही शिरसाठ म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाची चर्चा महायुतीमध्ये योग्य प्रकारे सुरु असून सध्या येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत, असा दावा करताना शिरसाठ यांनी येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.