गुवाहाटी : Maharashtra Political Crisis Update : बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचा आणखी एक मास्टरस्ट्रोक दिला आहे. राज्याच्या राजकारणातील एकनाथ शिंदे गटाने आपले इरादे स्पष्ट केले असून पक्षाचे नवीन नाव निश्चित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदेंच्या गटाचं नाव ठरलं आहे. 'शिवसेना बाळासाहेब गट' असं नाव ठेवण्यात आले आहे, अशी माहिती बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी 'झी 24 तास'ला दिली आहे. शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांनी एक गट तयार केला आहे. यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि ठाकरे नाव न घेता जगून दाखवा, असे म्हणाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने 'शिवसेना बाळासाहेब गट' असं नाव देण्याचे ठरले आहे.


'शिवसेना बाळासाहेब' असे आमच्या गटाचे नाव ठेवले आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचे अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेले नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, पण विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.


या नावाची अधिकृत घोषणा आजच होणार आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले. आज दुपारी 4 वाजता शिंदे गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे. यावेळी ही अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.


जाणकारांच्या मते, नव्या नावावरुन आता शिवसेनेत बाळासाहेब गट आणि दुसरे उद्धव ठाकरे गट असे दोन गट होतील. त्यामुळे अशा स्थितीत यातून अधिकाधिक शिवसैनिक आपल्या गटाशी भावनिक जोडले जातील, असा होरा एकनाथ शिंदे गटाचा आहे.