`मला धनुष्यबाणाची गरज नाही`, एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
Eknath Shinde In Purandar, Pune : मला निवडून येण्यासाठी कोणत्याही निशाणीची (Dhanushbah) आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरंदर येथील सभेत म्हणाले.
पुणे : Eknath Shinde In Purandar, Pune : आमचीच खरी 'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण'ही आमचाच, असा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मला निवडून येण्यासाठी कोणत्याही निशाणीची (Dhanushbah) आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरंदर येथील सभेत म्हणाले. आता त्यांच्या या विधानानंतर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सभेला संबोधित करताना शिंदे म्हणाले, आम्ही जर बंडखोर आणि गद्दार असतो तर राज्यातील जनतेने आम्हाला स्वीकारले नसते. एवढ्या मोठ्या संख्येने सभेला लोक आले नसते. याचा अर्थ आमची भूमिका या जनतेने स्वीकारली आहे. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. फाईलींमध्ये काम करणारा नाही. सरकार बदललं आहे. बाळासाहेबांचं आणि प्रमाेद महाजनांंचे सरकार आले आहे.
जनतेने शिवसेना आणि भाजपला मतदान केले. या दोघांच्या युतीचे सरकार येणार या भावनेने आपण निवडणूका लढवल्या. त्यानंतर जनतेनीही तोच कौल दिला. शिवसेनेचे 56 आणि भाजपचे 105 आमदार निवडून आले. बहुमत जनतेने दिले. त्यामुळे शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन होईल असे वाटत असताना महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आतापर्यंतच्या इतिहासात लोक विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे जात असतात. आम्ही सत्तेत होतो. आमच्या सारखे मंत्री सत्ता सोडून पाय उतार झाले. मात्र मी सांगतो मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची आवश्यकता लागत नाही, एवढे काम मी मतदार संघात केले आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 40 आमदार त्यांच्या मतदार संघातली कहाणी मला सांगत होते. मला बंड करण्याची काहीच आवश्यकता नव्हती या सगळ्यांच्या समस्या ऐकून मी हे बंड केले, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
अन्याया विरुद्ध पेटून उठा, अशी बाळासाहेबांची शिकवण होती. त्याविरुद्ध आम्ही लढलो आणि जिंकलो. सर्वांनी आमच्या ऐतिहासिक बंडाची नोंद घेतली. जरा तरी काही झालं असतं तर आमचा कार्यक्रम झाला असता. एकनाथ शिंदे आणि 50 लोकांनी राजकीय आत्महत्या केली असं अनेकांना वाटत होतं. मात्र अशा परिस्थितीत आमचा प्रवास सुरु झाला आहे. बघा कसं काय होतं ते, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांना मोठे निधी उपलब्ध झाले. त्यांनी कामाला सुरुवात केली. भूमिपूजनं केली. मात्र शिवसेना नेत्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. आम्ही तक्रारी केल्या मात्र त्याचं काहीच झालं नाही. गेल्या दोन वर्षात शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले. शिवसैनिकांना खोट्या चौकशींना सामोरं जावे लागले. शिवसैनिक जेलमध्ये जावं लागले. त्यावेळी शिवसैनिकांना राष्ट्रवादीचे लोक बोलवून चौकशी गृहमंत्र्यांकडे लावू, अशी धमकी देत होते, असा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.