मुहुर्त ठरला! शिंदे गटातील मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता शिवसेनेतील शिंदे गटाचा नेता राष्ट्रवादी प्रवेश करणार आहे.
Shivajirao Adharao Patil Join NCP : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता शिरुर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे 'धनुष्यबाण' खाली ठेवून 'घड्याळ' हाती बांधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाला रामराम करत आढळराव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवाजी आढळराव पाटील हे सातत्याने चर्चेत आहेत. शिरुर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यातच महायुतीत ही जागा अजित पवारांच्या गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. अखेर ही चर्चा खरी ठरली असून नुकतंच आढळराव पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. यानंतर आढळराव पाटलांनी येत्या 26 मार्च 2024 रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करत जाहीर केले आहे.
"लोकसभेला उभा राहणार आणि यंदा जिंकणार"
याच पार्श्वभूमीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांशीही माझं बोलणं झालं आहे. या दोन्ही नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतही चर्चा केली. त्यामुळे 26 मार्चला पक्षप्रवेश करण्यास मला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मी ज्याअर्थी पक्षप्रवेश करतोय त्याअर्थी मला उमेदवारी मिळणार का हे प्रश्न विचारण्याची गरज नाही. मी लोकसभेला उभा राहणार आणि माझ्या जनतेला 100 टक्के खात्री आहे की मी यंदा जिंकणार असं त्यांनी सांगितले.
मी पहिली निवडणूक 30 हजारांच्या मताधिक्याने, दुसरी 1 लाख 80 हजार तर तिसरी 3 लाख 80 हजारांच्या मताधिक्याने जिंकलो. आता चौथी निवडणूक ही सर्व निवडणुकांचे रेकॉर्ड तोडेल. आम्हाला महायुतीतील घटक पक्षांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी अबकी बार 400 पार करायचे आहे. तसेच राज्यात मिशन 45 प्लस करण्यासाठी सर्व मतभेद बाजूला करुन आम्ही एकदिलाने काम करणार. आमची महायुती आहे. तिन्ही पक्षांनी जे ठरवलं आहे, त्यामुळे कुणी पळवला वैगेरे असं नाही. महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही सगळे काम करणार आहोत, असेही शिवाजी आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
शिरूर मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार अमोल कोल्हे आहेत. राष्ट्रवादी फुटीनंतर कोल्हे अजित पवारांसोबत येतील, असं बोललं जात होते. मात्र काही काळाने कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता शिरूर मतदारसंघात कोल्हेविरुद्ध आढळराव पाटील असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे.