Maharashtra Asssembly Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे हे जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांसाठी 29 ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. अर्जांची छाननी करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल. तसंच जर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यायचा असेल तर 4 नोव्हेंबरपर्यंत संधी असेल. 


दरम्यान 20 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 288 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याने एकाच वेळी सगळीकडे मतदान होईल. यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून, राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार हे निश्चित होईल. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी बहुमताचा 145 चा आकडा पार करावा लागणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने 25 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे. 


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम - 


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्जांची छाननी - 30 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
मतमोजणीची तारीख - 23 नोव्हेंबर
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत - 25 नोव्हेंबर



 


26 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यात 4.46 कोटी महिला आणि 4.97 कोटी पुरुष आहेत. तरुणांची संख्या 1.85 कोटी असून, 20.93 लाख पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत. तसंच राज्यात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रं असतील अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 


85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना घरुन मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पैसे, मद्य, ड्रग्जता वापर यावक बारकाईने लक्ष असेल अशीही माहिती देण्यात आली आहे.