तपास एनआयएकडे दिल्याने एल्गार परिषदेचे आयोजक न्यायालयात जाणार
भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे
मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात आल्याच्या विरोधात एल्गार परिषदेचे आयोजक न्यायालयात दाद मागणार आहेत. भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी ही माहिती दिली. आरएसएसशी संबंधित मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हेच भीमा कोरेगाव दंगलीचे सूत्रधार आहेत. त्यांना वाचवण्यासाठी तसेच राज्यातील आधीचे सरकार, केंद्र सरकार आणि पुणे पोलीस यांचं षड्यंत्र झाकण्यासाठी हा तपास एनआयएकडे देण्यात आल्याचा आरोप यांनी केला आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी म्हणून महाआघाडी सरकारकडे मागणी होत असताना हा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत.
शरद पवार यांनी या प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र ही पाठवलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत आढावा बैठक ही घेतली होती. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ही पुरावे मागण्यात आले होते. पण अमित शहा यांच्या गृहमंत्रालयाने महाआघाडीला शह देत हा तपास एनआयएकडे सोपवला. महाआघाडी सरकारकडून एसआयटी चौकशीची तयारी सुरु असतानाच केंद्राने हा तपास एनआयएकडे सोपवला.
पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दिवशी १ जानेवारीला हिंसाचार झाला होता. त्यानंतर या प्रकरणात डावे, पुरोगामी आणि नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती.