Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून आजवर सुमारे ७३,८४८ अर्जदारांनी अर्ज केले असून त्यापैकी ५१,००० अर्जदारांनी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. विहित मुदतीत अर्ज केलेल्या अर्जदारांना दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत उपलब्ध राहणार आहे. तसेच दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS/NEFTद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात दि. २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.  दि. ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत मिळण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार व नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी पुणे मंडळाने सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता दि. ३० ऑक्टोबर, २०२३ पर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देत नवीन वेळापत्रक जाहीर केले.         


 नवीन वेळापत्रकानुसार दिनांक ३० ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत असून दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दिनांक ०८ नोव्हेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी २० नोव्हेंबर, २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.


म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यातील ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक  गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.