मुंबई  : पुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे ४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.  विप्रो लिमिटेड कंपनीच्या मदतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.  हे विशेष कोविड रुग्णालय हिंजवडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक माहिती तंत्रज्ञान,  सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुणे येथे  ४५० खाटांचे  विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच  राज्य शासनासमवेत केला आहे. राज्य शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.


विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे या प्रसंगी म्हणालेत. दरम्यान, हे ४५० खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे  कोविड १९ साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल.


या विषाणुविरुद्ध लढताना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.  या विषाणूचा मानवी जीवनावरील परिणाम टाळण्यासाठी या आपत्तीच्या प्रसंगात देशाप्रतीच्या समर्पित भावनेला कटिबद्ध राहून विप्रोने सहकार्याचा हात पुढे केला आहे तसेच विप्रो शासनासमवेत एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होत आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मत  विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी व्यक्त केले


विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने कोविड १९ विरुद्ध लढताना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  आतापर्यंत ११२५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या विप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने  मुंबई,  पुणे,  औरंगाबाद वाळूज,  अमळनेर,  अहमदनगर,  अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या  जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड १९ विषाणु विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत  देशातील ३४ लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.