शपथविधीनंतर लगेचच फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीच्या धोरणांवर टीका केली.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यातील तसेच देशभरातील महत्वाचे नेते मंचावर उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. शपथविधी झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस आणि पाटील हे शपथविधी झाल्यावर तात्काळ निघून गेल्याचे पाहायला मिळाले. शपथविधी सोहळ्यानंतर दोन तासांच्या आतच देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेत्याच्या भुमिकेत पाहायला मिळाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमातील धोरणांवर टीका केली.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीच्या धोरणांवर टीका केली. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा नामोल्लेख नसल्याचे निदर्शनास आणून दिले. या भागांकडे नवे सरकार त्याकडे लक्ष देईल अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली.
त्याआधी तासाभरापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोजक्या शब्दात शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला उमदे, संयमी नेतृत्व मिळाले असले तरी दुसरीकडे फडणवीस यांच्या रुपाने दमदार विरोधी पक्षनेता देखील मिळाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जरी अनुभवी नेत्यांचा भरणा असला तरी त्यांना फडणवीस यांच्या टीमला सामोरे जाण्याचे आव्हान आहे.
शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर महाराष्ट्र सेवक अशी ओळख ठेवली आहे.