पुणे हादरलं! माजी नगरसेविकेवर बलात्कार; पर्वतीमध्ये गुन्हा दाखल; आरोपीने फोटो, व्हिडीओ दाखवून..
Pune Ex Corporator Raped: या महिलेचे आणि आरोपीचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मागील बऱ्याच वर्षांपासून या महिलेचा छळ सुरु होता असं तक्रारीत म्हटलं आहे.
Pune Ex Corporator Raped: पुण्यामधील एका माजी नगरसेविकेला ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्येचं माहेर घर तसेच महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये चक्क एका माजी नगरसेविकेबरोबर असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये जुने फोटो दाखवून नगरसेविका राहिलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याने शहरातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
गुन्हा दाखल
समोर आलेल्या माहितीनुसार, मैत्रीपूर्ण संबंधांमधून संबंधित पीडित नगरसेविकेबरोबर काढलेले फोटो दाखवून धमकावण्यात आलं. या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार पर्वती पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यातील तपशीलामध्ये आरोपीचं नाव सचिन असं असल्याचं समजतं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि पीडित माजी नगरसेविकेमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. याच संबंधांचा फायदा घेत आरोपीने नगरसेविकेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन व्हायरल करण्याची धमकी सचिनने या माजी महिला नगरसेविकेला दिली.
मागील 6 वर्षांपासून सुरु होता हा प्रकार
तसेच सचिनने या महिलेला आपले हे फोटो आणि व्हिडीओ तुझ्या पतीला दाखवेल आणि तुझा संसार उद्धवस्त करेल अशी धमकीही दिली. या महिलेला बदनामीच्या नावाने धमकावत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तब्बल 2017 सालापासून हा संपूर्ण प्रकार सुरु होता, असं या पीडित महिलेचं म्हणणं आहे. याच कालावधीमध्ये आरोपीने संबंधित महिलेला धमकावून तिच्याकडून तब्बल 10 लाख रुपये घेतल्याचंही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
पोलिसांनी सुरु केला तपास
आर्थिक आणि लैंगिक शोषणानंतरही आरोपी सचिन या माजी नगसेविकेला छळत होता. तब्बल 6 वर्ष या आरोपीकडून होणारा छळ सहन केल्यानंतर या छळाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी लैंगिक छळाबरोबरच, खंडणी आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. या आरोपीने पैशांचं काय केलं, या कटामध्ये इतर कोणी सहभागी होतं का? त्याने हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला पाठवले आहेत का? यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत.