माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात साडेचार हजार पानी दोषारोप पत्र दाखल
गुन्ह्याची उकल करताना पुणे पोलीसांनी सायबरतज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांची मदत घेतली. मात्र, यादरम्यान त्यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करताना आरोपींच्या खात्यावरील क्रिप्टोकरन्सी या दोघांनी परस्पर इतर खात्यावर वळवत या दोघांनी पोलिसांची दिक्षाभूल करत कोटीचा गंडा घातला.
पुणे - बीटकॉईन गुन्हयातील दोन आरोपी सायबरतज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांच्या विरोधात साडेचार हजार पानी दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे सायबर पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात चार हजार ४०० पानी दोषारोपपत्र सोमवारी दाखल केले आहे. याबाबत एकूण २५ साक्षीदार यांचे जबाब पोलिसांनी जबाब नोंदवले आहे. रविंद्र पाटील याच्याकडील चौकशीत पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध ३४ प्रकारची सहा कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. पाटील यांनी त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या नावावर क्रिप्टोकरन्सीचे वॉलेट काढले होते. आरोपींच्या खात्यातून बीटकॉईन वर्ग केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी पाटील यांच्या पत्नी आणि भाऊ यांच्या विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नेमके प्रकरण काय?
पुणे पोलीसांकडे २०१७ मध्ये आभासी चलनाविरोधात दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्याची उकल करताना पुणे पोलीसांनी सायबरतज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांची मदत घेतली म्हणून काम करत होता. मात्र, यादरम्यान त्यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करताना आरोपींच्या खात्यावरील क्रिप्टोकरन्सी या दोघांनी परस्पर इतर खात्यात वळविल्याचे तसेच खात्यावर कमी बीटकॉईन असल्याचे स्क्रीनशॉट दाखविल्याचे केवायसीच्या रिपोर्ट मध्ये पुणे सायबर पोलीसांना दिसून आले. यांनतर आर्थिक गुन्हे शाखेच्या महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत या दोघांनी तांत्रिक पद्धतीने घोटळा केल्या उघडकीस आले.
रविंद्र पाटील कोण आहेत?
रविंद्र पाटील याचे अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण झालेले असून सन २००२ बॅचचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी जम्मू-काश्मीर कॅडेर मिळाले होते. मात्र,आयपीएसच्या नोकरीत पाटील याचे मन रमले नाही आणि अल्पावधीत त्याने राजीनामा देऊन खासगी कंपनीत ते रुजू झाले. आतरराष्ट्रीय स्तरावरील के.पी.एम.जी. या नामांकित कंपनीत ई-डिसकव्हरी, सायबर तज्ञ म्हणून वरिष्ठ पदावर पाटील काम करत होते. त्याचप्रमाणे चीन मध्ये हाँगकाँग येथेही काही काळ त्याने काम केले.
आतापर्यंत रविंद्र पाटील याने २३६ बीटकॉईन इतरत्र वळविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. बीटकॉईन गुन्हयातील पैशातून त्याने वेगवेगळया ठिकाणी गुंतवणुक केल्याचे ही स्पष्ट झाले असून त्याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहे.