बीड : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण देखील वाढलं आहे. आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे एका माजी सैनिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच आजोबांचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी सैनिक हरिभाऊ मोठे यांचं वयाच्या 75 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. पण येथे बेड उपलब्ध नसल्याने त्यांना नगर रस्त्यावरील लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांना श्वास घेण्यात अडचण असल्याने त्यांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता होती. 


दहा दिवस पायपीट करुन देखील बेड मिळाला नाही. त्यानंतर त्यांना पुण्यातील मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांनी आपला जीव सोडला. 


या प्रकारामुळे बीडमधील आरोग्य यंत्रणा किती कमकुवत असल्याचं समोर आलं आहे. आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.