Maharashtra Political News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये करण्याचे सत्र सुरुच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर वाद कुठे शमतो ना शमतोच आता कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. प्रतापगडावर (Pratapgad) शिवप्रतादिनानिमित्त बोलत असताना लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या बंडासोबत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्यातून आपली सुटका करुन घेतली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?


शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी. बाहेर पडून ते हिंदुत्ववाचे रक्षण करत आहेत, असे विधान लोढा यांनी केले आहे.


एकनाथ शिंदेंना कोणी अडवले होते - छगन भुजबळ


"तुम्हाला इतिहास तरी माहित आहे का? शिवाजी महाराजांना आग्र्याला आधी सन्मानाने घेऊन गेले आणि तिथे अपमान केला. त्यानंतर शिवाजी महाराज त्यांच्या बरोबर असलेल्या संभाजी महाराजांसोबत तिथून बाहेर पडले. शिवाजी महाराज दिल्लीत मुघलांच्या तावडीत होते. एकनाथ शिंदे तर मागच्या सरकारमध्ये मंत्री होते कोणी त्यांना अडवलं होते. इथे कोणते मुघल होते? त्यामुळे महाराज ग्रेट होते इतकंच बोला," असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 


मंगलप्रभात लोढांचे स्पष्टीकरण


मी एकनाथ शिंदे यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केली नाही. तर त्यांच्या क्रियेशी तुलना केली. मागच्या दोन तीन वर्षाच्या शासन काळात मुस्लिमांचे तूष्ठीकरण मोठ्या प्रमाणात केले गेले, असे स्पष्टीकरण मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहे.


महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याची या सरकारची योजना - आदित्य ठाकरे


"महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याची या सरकारची योजना आहे. राज्यपाल जे बोलले तेच हे मंत्री बोलले आहेत. महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे.  हे नेते मुंबईचे वास्तव ओखळणारे नाहीत. या पक्षाचा हा एककलमी कार्यक्रम झाला आहे," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.