आदित्य ठाकरेंविरोधात पोस्ट, उमेदवाराला निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट.
कोल्हापूर : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केलेल्या उमेदवाराला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंग केल्याची नोटीस बजावली आहे. प्रशांत गंगावणे असे या उमेदवाराचे नाव असून ते हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आरे प्रकारणावर पोस्ट करताना गंगावणे यांनी आदित्य ठाकरे यांचा धूर काढताना फोटो तयार करून एवढा कडकगांजा देशात आला कोठून असा उल्लेख केला आहे. याचा २४ तासात खुलासा करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे देण्यात आले आहे.
आदित्य वरळीतून रिंगणात
दरम्यान, शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार व्यक्त करत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आदित्य हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर आरे जंगल तोड प्रकरणी त्यांनी आक्रमकपणा घेतला होता. जंगल वाचवाची हाक दिली होती. तर दुसरीकडे आदित्यचे लहान बंधू तेजस ठाकरेही हळू हळू राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळीच्या सभेत पहिल्यांदा दिसणारे तेजस ठाकरे उद्धव ठाकरेंच्या संगमनेरच्य़ा सभेत थेट स्टेजवरच अवतरले.
'तेजस जंगलात रमणारा व्यक्ती'
आपल्या वडिलांसोबत आलेला तेजस आधी खाली कार्यकर्त्यांमध्ये बसलेला होते. मात्र नेत्यांनी त्याला आग्रह करत स्टेजवर बोलवले. त्यानंतर तेजसचे हारतुरे देऊन स्टेजवर स्वागत करण्यात आले. मात्र तेजस जंगलात रमणारा व्यक्ती असून तो केवळ सभा पाहण्यासाठी आल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी तेजसच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.