काय सांगता, आकाशातून चक्क सोन्याच्या मण्यांचा पाऊस, पाहा काय आहे नेमका प्रकार
महामार्गाच्या कडेला पडलेले सोन्याचे मणी गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाली
मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : कधी कोणती बातमी कशी पसरेल याचा काही नेम नाही. अशीच एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांची झुंबड उडाली. ही घटना आहे बुलडाणा जिल्ह्यातली. त्याचं झालं असं की, बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-औरंगाबाद-नागपूर महामार्गावर डोनगावजवळ काल दुपारच्या सुमारास काही लोकांना सोन्याच्या मण्यांसारखे मणी पडलेले दिसले.
झालं, महामार्गाच्या कडेला सोन्याचे मणी पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बघता बघता मणी जमा करण्यासाठी एकच गर्दी झाली. प्रत्येकजण मणी गोळा करण्यासाठी धडपड करु लागला.
सोन्याच्या मण्यांचा पाऊस पडलाय असं सगळ्यांनाच वाटत होतं. त्यामुळे मिळेल तो मणी उचलून लोक खिशात टाकत होते... यावेळी काही वेळ वाहतूक सुद्धा थांबलेली होती...हा प्रकार सुमारे 15 ते 20 मिनिटे सुरू होता.
अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोन्याच्या मण्याची शहानिशा करण्यात आली. काहींनी मणी फोडून पाहिल्यावर तो फुटल्याने हिरमोड झाला...सापडलेले मणी सोन्याचे नव्हते तर सोन्या सारखे दिसणारे नकली होते.