मुंबई : राज्य सरकारने अनुदान थांबविल्याने महाबीजने यंदा महागात बियाणे विकले आणि हे महाग बियाणे खरेदी करून सुद्धा ते बोगस निघाले. यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत असून, दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना संकटाच्या काळात शेतकरी आधीच त्रस्त असताना आता बोगस बियाण्यांमुळे त्याच्यावर आणखी मोठे संकट कोसळले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. हे बोगस बियाणे महाबीजने पुरविल्यामुळे शेतकर्‍यांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा? महाबीजने शासकीय अनुदान न मिळाल्याने सोयाबीनची 30 किलोची एक बियाण्यांची बॅग यंदा १७०० पयांऐवजी २३०० रुपयांना विकली. हा पैसा खर्च करून सुद्धा शेतकर्‍यांची पुरती फसवणूक झाली आहे. सोयाबीनचे बियाणे उगविलेच नाही, अशी जवळजवळ संपूर्ण राज्यात स्थिती आहे.'



'महाबीजने दर वाढविल्याने बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला. प्रचंड परिश्रमाने पेरणी केल्यानंतर बियाणे उगविलेच नसल्याने आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याला दुबार पेरणीसाठी तातडीने मदत करणे आवश्यक आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या जीवनाशी खेळणारे महाबीजचे दोषी अधिकारी आणि या बोगस बियाणे कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.' असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.