९७ लाखांच्या बनावट नोटा... मुंबईतून चौघांना अटक
नागपूर पोलिसांनी जप्त केलेल्या ९७ लाखाच्या बाद नोटांच्या प्रकरणात नवीन वळण लागलं आहे. या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांतही आहेत का? याचा तपास आता नागपूर पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.
अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : नागपूर पोलिसांनी जप्त केलेल्या ९७ लाखाच्या बाद नोटांच्या प्रकरणात नवीन वळण लागलं आहे. या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांतही आहेत का? याचा तपास आता नागपूर पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मिळालेल्या माहिती आधारे शहरातल्या एका घरातून ९७ लाखाच्या बाद नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणी प्रसन्न पारधी नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याचा साथीदार कुमार छुगानी फरार आहे.
या घटनेचा पाठपुरावा करत गुन्हे शाखेनं मुंबईतून चौघांना अटक केली आहे. कुमार छुगानी आणि त्याच्या साथीदारांमार्फत हे चौघे आरोपी, कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलत असत, अशी माहिती नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलीय.
हा गोरखधंदा नागपूर किंवा राज्यापुरता मर्यादित नसून महाराष्ट्राबाहेरही धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी बोलून दाखवली आहे. शिवाय बाद नोटा बदलण्याची प्रक्रिया केवळ रिजर्व्ह बँक किंवा सहकारी बँकेच्या माध्यमातूनच होत असल्यानं त्या दृष्टीनंही नागपूर गुन्हे शाखा तपास करत आहे.