सोन्याऐवजी तुम्ही पितळ तर खरेदी करत नाही ना? दिवाळीत सोनं खरेदी करताना सावधान
दिवाळीत सोनं खरेदी करताय? जरा थांबा.. सोन्याच्या नावाखाली तुम्हाला पितळ टेकवलं जाऊ शकतं.
Fake Gold : दिवाळीत सोनं खरेदीचा उत्साह काही औरच असतो.. मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी सराफा बाजार फुललेत. अनेक जण या काळात सोन्यातील गुंतवणूक शुभ मानतात. कोणी दागिन्यांची खरेदी करतो, तर कोणी सोन्याचे बिस्किट, पत्रा याची खरेदी करत असतो. मात्र ही सोनं खरेदी करताना सावध राहा..नाहीतर सोन्याऐवजी पितळ तुमच्या हातात येईल. भेसळयुक्त मिठाईप्रमाणेच भेसळयुक्त आणि नकली सोन्याचा बाजारात सुळसुळाट झालाय.. सोन्याऐवजी तुम्ही पितळ तर खरेदी करत नाही ना, याची काळजी कशी घ्याल..
नकली सोनं कसं ओळखाल?
हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही असली-नकली सोनं तपासू शकता.
750 हॉलमार्क असलेलं सोनं 75.0 % शुद्ध असतं
सोन्याजवळ मॅग्नेट ठेवा, मॅग्नेटजवळ सोनं ओढलं गेलं तर सोनं नकली आहे असं समजा
सोनं दातात ठेवा, दाताचे वळ उठले तर ते अस्सल आहे. अस्सल सोनं नाजूक असतं
सोनं खरेदी करताना हॉलमार्क तसंच मेकिंग चार्जेस अत्यंत महत्त्वाचे असतात हे ग्राहकांनी विसरता कामा नये..
दिवाळीत मुहूर्तावर सोनं खरेदी ही मर्मबंधातील ठेव असते. सोनं खरेदीच्या आठवणी पुढच्या अनेक वर्षात ताज्या होत असतात. मात्र या उत्साहात तुम्हाला सतर्क आणि सजग राहावं लागेल. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.
मुंबईवर प्रदूषणाचे संकट
दिवाळी काही दिवसांवर आली असताना मुंबईत वेगळेच संकट निर्माण झालंय. मुंबईत हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. प्रदूषणाचा एक्यूआय 300 पेक्षा जास्त झालाय. मुंबईतील प्रदूषणाची ही सर्वोच्च पातळी आहे. मुंबईतील वाढलेल्या प्रदूषणामुळे दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध आणलेत. आता मॉर्निंग वॉकला जाण्यास बंदी केली गेलीय. मुंबईतील प्रदूषण वाढल्यामुळे मुंबईची तुलना दिल्लीशी होऊ लागलीय. मुंबईत दृश्यमानता सकाळी ११ पर्यंत चांगली होत नाही. यामुळे सकाळी जास्त अंतरावरील वस्तू, वाहन दिसत नाहीये.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची दिवाळी यंदा घरीच साजरी होणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांची दिवाळी यंदा घरीच साजरी होणार आहे. डेंग्यूच्या आजारातून अजित पवारांची प्रकृती हळुहळू सुधारतेय.. मात्र पूर्ण बरं होण्यासाठी डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिलाय. त्यामुळं यंदाच्या वर्षी दिवाळीला कुणालाही भेटणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं दरवर्षी बारामतीत होणा-या पवार कुटुंबीयांच्या दिवाळी पाडवा कार्यक्रमातही ते सहभागी होणार नाहीत. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे, असं सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.