Mumbai Darshan Bus: मुंबईला मायानगरी म्हटलं जातं. मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच ती देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. देशभरातून मुंबईत आलेल्या पर्यटकांना मुंबईची सफर घडवणारी बेस्टची डबल डेकर ओपन डेक बस ऑक्टोबर महिन्यापासून बंद होत आहे. म्हणजेच, ओपन डेक बसमधून होणारे मुंबई दर्शन 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळं पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई दर्शनासाठी सध्या सेवेत असलेल्या तिन्ही ओपन डेक बसचे आयुर्मान संपल्यामुळं या जुन्या बस आता हद्दपार होणार होणार आहेत. त्यामुळं 5 ऑक्टोबर 2023पासून पूर्णपणे मुंबई दर्शन सेवा बंद होणार आहे. याआधी पहिली ओपन डेक बस 16 सप्टेंबर रोजी सेवेतून बाहेर करण्यात आली होती. त्यानंतर उरलेल्या दोन बस 25 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी हद्दपार करण्यात येणार आहेत. 


मुंबईतील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने 26 जानेवारी 1997 रोजी नॉन एसी ओपन डेक बस सुरू केली होती. या बसमध्ये अप्पर डेक व लोअर डेक असे दोन पर्याय देण्यात आले होते. मात्र, आता या तीनही बस सेवेतून हद्दपार होणार आहेत. 


दरम्यान, बेस्टकडून भाडेतत्वावर 50 एसी डबल डेकर पर्यटन बस सेवेत आणण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला होता. त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. मात्र, या बसेससाठी अधिक किंमत मोजावी लागणार असल्याने त्याची निविदा रद्द करण्यात आली होती. त्यामुळं आता बेस्टच्या माध्यमातून पर्याटकांना घडणारे मुंबई दर्शनही बंद होणार आहे. 


सध्या सेवेत असणाऱ्या ओपन डेक बसचा आनंद साधारण 20 हजार प्रवासी दर महिन्याला घेत होते. या बसच्या अप्पर डेकसाठी प्रतिप्रवासी 150 रुपये आणि लोअर डेकसाठी 75 रुपये शुल्क आहे. क्षिण मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एन.सी.पी.ए, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापिठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगर पालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, रिझव्ह बँक ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस ही ठिकाणे ओपन डेक बसमधून पर्यटकांना दाखवण्यात येतात.