शेतकऱ्याच्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे तहसील कार्यालयात खळबळ
...
नांदेड: मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तरूणाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे सोमवारी (११ जून) एकच खळबळ उडाली. पण, अशीच घटना नांदेड जिल्ह्यातही घडल्याचे पुढे आहे. येथील संतोष लक्ष्मण माने नावाच्या तरूणाने तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा तरूण वडीलोपार्जीत जमीन आपल्या नावावर करून देण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून तहसील कार्यालयात फेऱ्या मारत होता. पण, काम होत नसल्याने तो कंटळला होता, अशी प्राथमिक माहिती आहे.
आत्मदहनाबाबत दिले होते पत्र
घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, संतोष लक्ष्मण माने हा तरूण हदगांव तालुक्यातील वायफना गावचा रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडीलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे वडलोपार्जीत जमन आपल्या नावावर करून मिळावी, अशी मागणी त्याने केली होती. त्यासाठी तलाठी व तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. पण, अर्जविनंत्या करून आणि अनेक चकरा मारूनही त्याचे काम होत नव्हते. उलट प्रशासनाकडून टाळाटाळच होत होती. त्यामुळे संतोष वैतागला होता. या वैतागातून त्याने २४ मे रोजी आपल्याला वारस प्रमाणपत्र तसेच शेती नावावर करून न दिल्यास आपण आत्मदहन करू असा इशारा एका पत्राद्वारे तहसीलदारांकडे दिला होता. पण, तहसील प्रशासनाने तो गांभीर्याने घेतलाच नाही.
हदगांव तहसील कार्यालयात खळबळ
दरम्यान, संतोष हा सोमवारी दुपारी खरोखरच तहसील कार्यालयात आला. त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला. तरूणाचे एकूण वर्तन आणि कृत्य पाहून उपस्थितांना त्याच्या कृतीचा अंदाज आला. त्यांनी तातडीने त्याला तसे करण्यापासून रोखले आणि त्याचा प्राण वाचला. पण, या प्रकारामुळे हदगांव तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली.