सोलापुरातील करोडपती दुधवाला! गायीचे दूध, शेण विकून बांधला 1 कोटीचा बंगला, प्रवास ऐकून थक्क व्हाल
Success Story of Prakash Imde: सोलापूरच्या शेतकऱ्याने फक्त गायीचे दूध आणि शेण विकून मोठा व्यवसाय उभारला आहे. य व्यवसायातून त्यांनी 1 कोटींचा बंगला बांधला आहे.
Solapur Farmer Success Story: गायीचे दूध आणि शेणाच्या विक्रीतून सोलापुरच्या शेतकऱ्याने तब्बल 1 कोटींचा बंगला बांधला आहे. प्रकाश इमडे असं या प्रगतीशील शेतकऱ्याचे नाव आहे. सुरुवातीला प्रकाश यांच्याकडे केवळ एक गाय होती. आता त्यांच्याजवळ कमीत कमी 450हून अधिक गोधन आहे. प्रकाश यांनी त्यांच्या घराचे नावही गोधन निवास असं ठेवलं आहे. प्रकाश यांनी खडतर प्रवासातून प्रगती केली आहे. जाणून घेऊया त्यांची यशोगाधा
प्रकाश यांना गावातील नागरिक प्रेमाने बापू असं म्हणतात. बापू दिवसाच्या सुरुवातीलाच गाय व देवी लक्ष्मीची पूजा करतात. गायीचा फोटो त्यांच्या देवघरात आहे. एका गायीपासून त्यांनी आज कोटींचा व्यवसाय उभारला आहे. जिच्यामुळं इतकं वैभव मिळालं आहे. त्या आईचा फोटो त्यांनी देवघरात ठेवला आहे. तसंच, बंगल्यालाही गोधन निवास नाव दिलं आहे. घरावर गायीचा आणि दुधाच्या किटलीचा पुतळा उभारला आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे हे घर लक्ष वेधून गेले.
प्रकाश इमडे ये दूध आणि शेणातून वर्षाला दीड कोटी रुपयांचे उत्पन्न घेतात. प्रकाश यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर जमीन व एक गाय होती. १९९८ साली या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. त्यांना जी जमिन मिळाली ती कोरडवाहू होती. त्याच्यावर शेती करणे अशक्य होतं. अशावेळी त्यांनी शेती सोडून दूध आणि शेण विकण्यास सुरुवात केली. एकाच गायीपासून त्यांनी जवळपास 150 गायी वाढवल्या आहेत. प्रकाश यांचे संपूर्ण कुटुंब आता या व्यवसायात आहे. आज दिवसाला 1 हजार लिटर दूधाचे उत्पादन ते घेतात. गायीला चारा देणे, त्याचे दूध काढणे आणि त्यांची काळजी घेणे, ही सगळी काम तेच करतात.
ज्या गायीपासून व्यवसाय सुरू केला त्या गायीचे नाव लक्ष्मी होते. त्याच गायीच्या वंशावर ही वंशवेल त्यांनी वाढवत नेली. 2006 साली लक्ष्मीचा मृत्यू झाला. त्यांनी आत्तापर्यंत एकही बछडा विकला नाहीये. आज प्रकाश यांच्या गोठ्यात तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यांच्या व्यवसायामुळं आज गावात अनेकांना रोजगार मिळाले आहे.
जनावरांना रोड चार ते पाच टन हिरवा चारा लागतो. बापू टेंडर काढून चारा विकत घेतात. दुधावरील जनावरांना मुरघास आणि दुसऱ्या गायींना हिरवा चारा दिला जातो. त्यांनी जनावराच्या पाण्यासाठी शेतातच मोठे शेततळे उभारले आहे. प्रकाश यांचे हे वैभव पाहण्यासाठी रोज राज्यभरातून व इतर राज्यातूनही दूध व्यावसायिक भेट देतात.