कृषी पंपाला वीज जोडणी केलेली नसतानाही पाठवलं वीज बील
वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामुळे नेहमीच चर्चेच असतं. त्याचा नमुना नंदुरबार जिल्ह्यात नव्याने अनुभवता आला.
नंदुरबार : वीज वितरण कंपनी आपल्या कारभारामुळे नेहमीच चर्चेच असतं. त्याचा नमुना नंदुरबार जिल्ह्यात नव्याने अनुभवता आला. उमर्दे येथील वयोवृद्ध एकनाथ मराठे या शेतक-याला कृषी पंपाला वीज जोडणी दिलेली नसताना वीज बिल देण्याचा पराक्रम केलाय.
एकनात मराठे या शेतक-यानं सन २०१४ मध्ये आपल्या शेतात विहीर खोदली आणि विहिरीला पाणीही लागलं. आता आपल्याला दुष्काळाशी दोन हात करता येतील असं स्वप्न त्यांनी उतारवयात उराशी बाळगलं. कृषी पंपासाठी वीज जोडणीची मागणी केली. त्यासाठी अनामत रक्कमही भरली. त्यासाठी त्यांना सहा हजार रुपयांची पावती देण्यात आली. मात्र त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्याकडून १२ हजार उकळण्यात आले.
यावर विद्युत वितरण कंपनीचा कारभार थांबला नाही. त्यांना वीज जोडणी दिली नसताना त्यांना ५ अश्व शक्तीचा पंप वापरला म्हणून सहा हजार रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले. वयोवृद्ध शेतक-याला आपल्याला वीज बिल कश्याचे आले असा प्रश्न पडलाय.
दोन ते तीन वर्ष वीज जोडणी दिली नाही, शिवाय वीज जोडणी न देता वीज बिल पाठवणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्राकार असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.
या संदर्भात विद्युत वितरण कंपनीच्या अधिका-याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. उर्जा मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी वीज ग्राहकांशी संवाद साधला, त्यावेळी अधिका-यांनी सोयीची उत्तरं दिली.. मंत्री महोदयांचा दौरा आटोपला खरा पण वीज ग्राहकांचे प्रश्न मात्र अजूनही कायम आहेत.