परभणी : वाढत चाललेल्या कर्जाच्या पार्श्वभूमीवर बाप आत्महत्या करील या भीतीनं एका मुलीनं आपली जीवनयात्रा संपवलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाथरी तालुक्यातील जवळाझुटा इथं ही दुर्दैवी घटना घडलीय. सारिका सुरेश झुटे असं या मुलीचं नाव आहे. ती बारावीत शिकत होती. राहत्या घरी सारिकानं गळफास लावून आत्महत्या केलीय.   
 
धक्कादायक म्हणजे, सहा दिवसांपूर्वीच चण्डिकादास झुटे या सारिकाच्या काकांनी तणावाखाली येऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर वडिलांवर असलेलं कर्ज आणि पिकं वाळत चालल्याने वडील आत्महत्या करतील अशी भीती सारिकाच्या मनात घर करून होती. त्यामुळे, पित्याने आत्महत्या करू नये यासाठी तिनं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. 


आत्महत्या करण्याआधी सारिकानं एक चिठ्ठी लिहून ठेवलीय. आपल्या बहिणीचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं... त्याचंही कर्ज अजून फिटलेलं नाही... त्यातच दुसऱ्या मुलीच्या लग्नासाठी वडिलांवर खर्चाचा भार नको, यासाठी सारिकानं जीवन संपवत असल्याचं म्हटलंय. 


धक्कादायक म्हणजे, गेल्या आठवडा भरात पाथरी तालुक्यात शेतकरी कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्यात. शेतकऱ्यांपाठोपाठ शेतकऱ्यांचा मुलांच्या आत्महत्येच्या विषयावरही गांभीर्यानं विचार होण्याची गरज निर्माण झालीय.