Hingoli Farmers Suicide News: हिंगोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतकऱ्याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नारायण खोडके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात ही घटना घडली आहे. खोडके यांच्या आत्महत्येमुळं संपूर्ण कुटुबीयांना धक्का बसला आहे. खोडके यांची मुलगी इयत्ता आठवीत शिकत असून या चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण खोडके यांच्यावर कर्जाचा भार झाला होता. तसंच, सततची नापिकी यामुळं ते चिंतेत होते. याच कारणांमुळं त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. किरण खोडके असं या चिमुकलीचे नाव आहे. पत्रात तिने बाबांना परत बोलवण्यासाठी देवाघरचा नंबर देण्याची विनंती केली आहे. किरण खोडकेने हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होत आहे. 


चिमुकलीने पत्रात काय म्हटलंय?


'सर, तुमचा दसरा चांगला गेला, तुमची दिवाळी पण चांगली जाणार. आमच्या घरी दसरा नाही, दिवाळी नाही. आई रडत असते. सारखी म्हणते मालाला भाव असते तर तुझा बाबा मेला नसता. वावरात सोयाबीन कमी झालं. आई न बाबाचं भांडण झालं, आणि आमचा बाबा पुन्हा आला नाही. आजीला विचारलं तर ती म्हणते देवाघरी गेला. सर देवाचं घर कुठं आहे. त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबांना पाठवा लवकर, दिवाळी येणार आहे, आमच्या घरी दोन दीदी मी आणि दादा आहोत, रोज बाबाची वाट पाहतो, पण ते येत नाहीत. मग आम्हाला दिवाळीला बाजारात कोण नेईल, कपडे कोण घेईलं?, असा सवाल तिने केला आहे. 


देवाला आम्ही सांगू बाबाला पाठवा आम्हाला दिवाळी बाजार आणायचा आहे. त्यांना म्हणावं तुमची दीदी खूप रडतेय, मग ते लवकर येतील, असं चिमुकलीने म्हटलं आहे. किरण खोडकेचे हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या या पत्राची एकच चर्चा आहे. यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने पिकं उद्ध्वस्त झाले आहेत. काही जणांकडे पीकविमादेखील नाहीये. त्यामुळं सरकार मदत करेल याआशेवर शेतकरी आहेत. चिमुकलीच्या या पत्रावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतील हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.