मांजर या पाळीव प्राण्यांचा अनेकजणांना लळा असतो. मालेगावात सुध्दा अश्याच मांजरीला पाळण्याचा मोह ठाकरे कुटुंबियांना आवरला नाही. मालेगावच्या मोरझर शिवारातील रावसाहेब ठाकरे यांना शेतातील घराजवळ एक मांजरीच्या पिलासारखे दिसणारे पिलू दिसले. मांजरीपेक्षा वेगळा रंग आणि दिसायला गोंडस असलेले बछडे ठाकरे कुटुबियांनी हवेहवेसे वाटले. मांजरीचे पिलू आहे असे समजून ठाकरे कुटुबियांनी त्या पिलूचा घरी आणून सांभाळ सुरु केला. कुटुंबीयांनाही बछड्याची ओळख न पटल्याने मांजरीचे पिलू म्हणून बछड्याला जीवापाड जपले. घरातील लहानग्यांनी सुध्दा या पिलूला अंगाखांद्यावर खेळवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हे मांजरीचे पिल्लू नसून ते बिबट्याचे बछडे असल्याचे कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांना धक्काच बसला. कुटुबियांनी त्या पिल्लाला पुन्हा शेतात न सोडताच सावधगिरी बाळगत घरीच ठेवले. रोज मायेची उब देत दररोज दीड लिटर दूध पाजून त्याचे संगोपन केले. आईची भेट होईल या आशेने बछड्याला रोज घराबाहेर ठेवण्याचा उपक्रम सुरू झाला. मात्र ठाकरे कुटुंबीयांच्या पदरी निराशा पडली. वाट चुकलेल्या बछड्याची आई परतलीच नाही. आठवडा उलटला तरी बछड्याची आई काही येईना. हताश ठाकरे कुटुंबीयांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळविली.


वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतले. या बछड्याची तपासणी वनविभागाकडून करण्यात आली. लळा लागलेल्या या बछड्याला वनविभागाच्या स्वाधीन करताच कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले.  वाट चुकलेल्या या बिबट्याच्या बछड्याने शेतकरी कुटुंबाच्या घरी तब्बल आठवडाभर मुक्काम ठोकला. कुटुंबीयांनाही बछड्याची ओळख न पटल्याने त्यांनीही मांजरीचे पिलू म्हणून मायेची ऊब देत या बछड्याला लळा लावला. घरातील लहानग्यांना या बछड्याला वनविभागाच्या स्वाधीन करताना अश्रु अनावर झाले.  आता या बछड्याला वनविभागाच्या हद्दीत सोडणार आहेत अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.