मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : झी२४ तासच्या बातमीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरूळ येथील शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यात आला आहे. मंगरूळ येथील भास्कर फरताडे यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी बैल जोडी विकली होती. त्यामुळे या दांपत्याकडे बैल जोडी नसल्याने आणि नवीन बैलजोडी घेण्यासाठी पैसे नसल्याने हे दांपत्य स्वत:च बैलांच्या जागी नांगराला जुंपून पेरणी सुरू केली होती. अशी बातमी १ जुलै (सोमवार) रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी ही बातमी पाहताच दिल्लीवरून दूरध्वनी करून फरताडे यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ओम निंबाळकर यांच्या सुचनेनुसार संग्राम देशमुख आणि शिवसेनेचे कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी तात्काळ मंगरूळ येथे जाऊन त्या शेतकरी कुटुंबाला सोयाबीनच्या दोन बॅग व खताची दोन पोती मदत म्हणून दिली. त्याचबरोबर ट्रॅकटरने त्यांची दिड एकर शेत पेरणी करुन दिली. या मदतीनंतर फरताडे कुटुंबीयांनी झी२४ तासाचे आभार मानले. 




सध्या जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस पडल्याने सर्वत्र बळीराजा पेरणीसाठी लागला आहे. पावसाच्या प्रतिक्षेत जून महिना संपला तरी पेरण्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकरी हैराण झाला होता. शिवाय उडीद आणि मूग या पिकाच्या लागवळीचा कालावधी संपल्याने शेतकरी सोयाबीन पेरणीवर जास्त भर देत होता. कोणी बैल जोडीने तर कोणी ट्रॅकटरने आपल्या शेतात पेरणी करत होता. मात्र फरताडे कुटुंबीयांनी कर्ज फेडण्यासाठी आपली बैल जोडी विकली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःला बैलांच्या जागी जुंपून पेरणीला सुरुवात केली होती. मात्र या मदतीनंतर फरताडे कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे. मदतीवेळी त्यांचा सुखवलेला चेहरा सर्वकाही सांगून जात होता.