शेतकऱ्यांनी तहसिल-प्रांत कार्यालयात सोडल्या बैलगाड्या
अमळनेर तालुक्यातील फापोरे येथील जुन्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांची पूर पाटचारीची दुरुस्ती व्हावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडीसह शेतकऱ्यांनी मोर्चा नेला आहे.
जळगाव : अमळनेर तालुक्यातील फापोरे येथील जुन्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांची पूर पाटचारीची दुरुस्ती व्हावी, या मागणीसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडीसह शेतकऱ्यांनी मोर्चा नेला आहे. सकाळी १० पासून सुरू असलेलं आंदोलन अजूनही सुरू आहे. प्रांत आणि तहसिलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बैलगाडे मोर्च्यानंतर ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत धार- मालपूर या गावांसह १२ गावातील ग्रामस्थांनी २ महिन्यांपासून ३ वेळा आंदोलनासह उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने कामाला कोणतीही गती दिली नाही, ही बाब निदर्शनास आल्याने आज हा मोर्चा काढण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील हे चित्र आहे.
यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर पुन्हा याबाबत प्रशासन ढिम्मच राहिले. ग्रामस्थांनी पुन्हा १४ मे रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला. यावेळीही प्रशासनाने याबाबत पूर पाटचारीची दुरुस्ती करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यास वेळ लागेल, असे सांगत पुन्हा मुदतवाढ मागितली.
प्रशासनाच्या विनंतीवरून ग्रामस्थांनी पुन्हा उपोषण मागे घेतले. दरम्यान पूर पाटचारीच्या कामाला वेग येईल असे वाटले होते. मात्र त्यात फारशी प्रगती दिसून आली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर बारा गावांमधील ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे बैलगाडीसह पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर धार मालपूरसह १२ गावाहून शेतकऱ्यांनी बैलगाडीसह मोर्चा आणला. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यापासून आंदोलनाला सुरवात करण्यात आली. हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. मोर्चात शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.