मराठवाडा आणि विदर्भावर वरुणराजा रुसला, बळीराजा चिंतेत
पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.
बीड : बीडपासून जवळच असलेल्या अंथरवण पिंपरी शिवारामध्ये रंगनाथ मसुरे यांची दहा एकर जमीन आहे. या जमिनीवर मसुरे यांनी जवळपास लाख ते दीड लाख रुपये खर्च करून तीस बॅग कापूस आणि चार बॅग बाजरी लावली. मात्र वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. येत्या चार दिवसांत पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागेल असं सांगताना मसुरे यांना अश्रू अनावर झाले.
जी परिस्थिीत बीडच्या रंगनाथ मसुरे यांची तशीच अवस्था ही अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथले सुधीर शेजोडे यांची आहे. त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली. मात्र पावसाचा पत्ता नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. पाऊस झाला नाही तर पीक करपण्याच्या मार्गावर आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्यात. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.