सरकारकडून खरंच नुकसान भरपाई मिळेल का? शेतकऱ्यांना सतावतेय चिंता
आधी अतिवृष्टी आणि पूर... आता अवकाळी पाऊस...
श्रीकांत राऊत, झी २४ तास, यवतमाळ : राज्यातील विजयी उमेदवार दिवाळी साजरी करीत असताना आणि राजकीय पक्ष सत्तास्थापनेच्या खेळात मश्गूल असताना शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलीय. परतीच्या पावसानं जोरदार दणका दिल्यानंतर आता नुकसानभरपाई कधी मिळणार? याची चिंता बळीराजाला सतावतेय.
वर्षभर शेतात कष्ट केल्यानंतर शेतमाल हाती यायची वेळ आली असताना परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे विदर्भातलं प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन, कापूस आणि ज्वारीचं प्रचंड नुकसान झालंय. पाऊस आणि वाऱ्यामुळे पऱ्हाटी आडवी झाली, कापसाचे बोंड भिजून गळून पडलेत, सोयाबीन पाण्यात गेलंय, तर ज्वारी काळी पडली आहे. मका भिजल्यानं अंकुरला असून तूर सडली आहे. भात पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कर्जमाफी नाही आणि त्यामुळे नवं कर्जही नाही. अशा स्थितीत सावकाराचे उंबरठे झिजवून शेतकऱ्यांनी पीक लावलं होतं. मात्र, पावसानं बळीराजाचं कंबरडं मोडलंय. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असताना लोकप्रतिनिधी सत्तेचा खेळ खेळत आहेत तर प्रशासन कागदी घोडे नाचतंय.
कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अमरावती विभागात १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांच्या ११ लाख ९६ हजार ५२ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात झालं असून त्याखालोखाल अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळमध्ये पिकांना पावसाचा तडाखा बसलाय.
आता पीक नुकसान सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री सोपस्कार करण्याचं त्राणही शेतकऱ्यांमध्ये शिल्लक नाही. अस्मानी संकटात सुलतानी कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय.
परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. आता लवकर नवं सरकार अस्तित्वात यावं आणि नुकसान भरपाईची कार्यवाही पूर्ण व्हावी, अशी रास्त अपेक्षा शेतकरी करत आहेत.