Ajit Pawar:अजूनही समाधानकार पाऊस पडलेला नाही, चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अर्थमंत्री पद मिळाल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. पाऊस आणि अर्थ खात्याचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मी जाहिरातबाजी करणारा नेता नाही,असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका आपल्याला बसतोय असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाच्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. त्यामुळे धरणातील पाणी काटकसरीनं वापरावं लागेल असंही ते म्हणाले. पुरेशा पावसाअभावी राज्यावर दुबार पेरणीचं संकट असल्याचेही ते म्हणाले. 


देशात मोदींच्या नेतृत्वाला दुसरा पर्याय नाही असेही ते म्हणाले. सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्राचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले. केंद्राकडून अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आगामी अधिवेशनात राज्याचे प्रश्न मांडणार असल्याचेही ते म्हणाले.


उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले होते. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मनाची साद ऐकून काकूंची भेट घ्यायला गेलो असे पवार म्हणाले.


काही नेते अद्यापही आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याचे ते म्हणाले. अधिवेशनाच्या चहापानादरम्यान विरोधक चर्चेला तयार असतील तर चर्चा करणार. कारण चर्चा करुन सर्व प्रश्न सुटू शकतात, यावर माझा विश्वास असल्याचेही ते यावेळी म्हणाले.