लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकरी पाऊस न पडण्याच्या विवंचनेतूनही आत्महत्या करु लागले आहेत. लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथील ४५ वर्षीय शेतकरी शिवाजी ज्ञानोबा पवार यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.
स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. मयत शिवाजी पवार हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे दोन एकर जमीन होती. तसेच लातूरच्या सिद्धेश्वर सहकारी बँकेचे दोन लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यात बी बियाणे, खतं घेण्यासाठीही पैसे नसल्यामुळे त्यांनी स्वतःची एक म्हैस विकली.
मात्र गेल्या दीड महिन्यापासून पेरणी योग्य पाऊसच पडत नसल्यामुळे पेरणी करणे ही अवघड झाले. घरी असलेल्या इतर दोन जनावरांना चारा देने ही अवघड झाले होते. अखेर याच विवंचनेत असलेल्या शिवाजी पवार यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
त्यांच्या या आत्महत्येमुळे संपूर्ण रायवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मयत शेतकरी शिवाजी पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुलं असा परिवार आहे.