यवतमाळमध्ये उन्हाच्या तडाख्यामुळे शेतकरी हैराण
तळपत्या उन्हात मशागतीची कामं करनं अवघड ठरत आहे.
श्रीकांत राऊत, यवतमाळ : निसर्गाच्या भरवशावर शेती करणारा शेतकरी यंदा उन्हाच्या तडाख्याने हैराण झाला आहे. सध्या पारा ४४ ते ४५ अंशावर वर गेला आहे. तरीही बळीराजाला भरउन्हात आपल्या शेतात राबावे लागत आहे. शेती मशागतीच्या कामावर वाढत्या उन्हाचा परिणाम दिसत असून शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चारा पाण्याचाही प्रश्न दुष्काळामुळे निर्माण झाला आहे.
मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा अंदाज धरून शेतकरी रखरखत्या उन्हात शेतात राबत आहे. परंतु तळपत्या उन्हात मशागतीची कामं करनं अवघड ठरत आहे. सकाळी ७ वाजतापासूनच कडक ऊन पडत असल्याने शेतीकामावर मजूर येत नसून बैलजोडीने नांगर फिरवणे आणि ट्रॅक्टरने मशागत करण्यास अडचणी येत आहे. भल्या पहाटे किंवा सायंकाळ नंतर ही कामे पार पाडावी लागत आहे.
पिकाची पेरणी करण्यापूर्वी जमीन नांगरणे, ढेकळे फोडणे, जमीन सपाट करणे, सऱ्या किंवा वाफे तयार करणे, अशी कामं करणं गरजेचं आहे. मात्र उन्हाच्या प्रकोपामुळे शेतीपूर्व मशागतीवर परिणाम झाला आहे. यावेळी उन्हासोबतच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने शिवाय नदी, नाले, धरणं कोरडे पडल्याने उन्हाळी पिकं देखील शेतकरी घेऊ शकली नाही.
उन्हाळ्याच्या सुरवातीपासूनच चारा पाण्याचा प्रश्न देखील उद्भवला, माणसांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत गेला. चाऱ्यांची मोठी टंचाई निर्माण झाली. गगनाला भिडलेल्या किमतीमुळे चारा खरेदी करणेही परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांनी गुरांना बाजारात विक्रीसाठी आणले. तेथेही दलालांकडून भाव पाडून गुरांची मागणी केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात शासनाच्या वतीने गुरांच्या चाऱ्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची उपाय योजना केली नसल्याची ओरड पशुपालकांमधून होत आहे.
चारा भावी गुरांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शिवारातील चारा करपून गेला आहे. त्यामुळे हिरवळ दिसेल त्या ठिकाणी चारा मिळवण्याची जनावरांची धडपड सुरू आहे. अशात ज्वारीचे फुटवे खाल्याने विषबाधा होऊन जिल्ह्यातील शेकडो जनावरे दगावली. ज्या पशुपालकांचा उदरनिर्वाह दुग्धव्यवसायावर आहे त्यांना देखील मोठा फटका बसला आहे.
निसर्गापुढे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. चारा आणि पाणीटंचाईमुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊनही शासन प्रशासनाच्या उपाययोजना मात्र कागदावरच राहिल्या आहेत. दुसरीकडे रोजगार हमी योजनेतून शेत मजुरीची कामं व्हावी. अशा नेत्यांच्या घोषणा देखील घोषणाच राहिल्या आहेत.