अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे :  सर्व वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. टोलनाक्यांवर वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी फास्टॅगची यंत्रणा सुरू केली. मात्र आता फास्टॅगही लवकरच बंद होणार आहे. पुढच्या काळात तुम्हाला रस्त्यावर तुम्हाला टोल नाकेही दिसणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे फास्टॅग बंद होण्याचं कारण
टोल नाक्यावरच्या वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं फास्टॅग आणला. मात्र आता हा फास्टॅगही लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. कारण संसदेच्या परिवहन आणि पर्यटन समितीनं फास्टॅग बंद करण्याची शिफारस केलीय. समितीनं याचा अहवालही संसदेत सादर केलाय. 


फास्टॅगऐवजी जीपीआरएस यंत्रणा आणण्याचा गंभीर विचार सरकार करतंय. टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडींवर मार्ग काढण्यासाठी फास्टॅगची यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र तरीही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचं समोर आलंय. तसंच वाहनधारकांना फास्टॅग ऑनलाईन रिचार्ज करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जीपीएस यंत्रणेमुळे यावर तोडगा निघणार आहे. 


जीपीएस यंत्रणेमुळे काय होणार? 
सर्व टोल नाके बंद होणार. त्यामुळे टोलनाक्यावरील वाहतूक कोडींचा सामना करावा लागणार नाही. संबंधित रस्त्यावरून प्रवास केल्यास थेट वाहनधारकांच्या बँक खात्यातून टोलचे पैसे कापले जाणार. त्यामुळे फास्टॅग रिचार्ज करण्याच्या कटीकटीतून वाहनधारकांची मुक्तता होणार. टोलच्या रांगामधून सुटका होणार असल्यानं मोठ्या प्रमाणात इंधनाची बचतही होणार. 



तसंच टोल नाका उभारण्यासाठी लागणारा खर्चही वाचणार असल्याचं संसदीय समितीनं आपल्या अहवालात नमूद केलंय. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी अनेकदा टोलनाकेमुक्त रस्ते करण्यासाठी जीपीएस यंत्रणा सुरू करण्याचा मानस अनेकदा व्यक्त केलाय. आता यादृष्टीनं सरकारनं पावलं उचलायला सुरूवात केली आहे. 


दिवसेंदिवस रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढू लागलीय. त्यामुळे टोलनाक्यांवर वाहतूक कोंडीचीही समस्या वाढत चाललीय. यावर काढलेला फास्टॅगचा उपायही तोकडा ठरल्याचं समोर आलंय. त्यामुळे जीपीएस यंत्रणा लवकरात लवकर सुरू करून वाहनधारकांची टोलच्या रागांमधून सुटका करण्याची गरज आहे.