पुणे : पुण्यातल्या सारथी संस्थेतल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ खासदार संभाजीराजे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा तरुणांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य करणारा सारथी उपक्रम बंद करायचा डाव असल्याचा आरोप करत, संभाजीराजे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील सारथी संस्थेसमोर ते उपोषण करणार आहेत. संभाजीराजे यांनी नुकतीच यासंदर्भातील माहीती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीराजे सारथी संस्थेसाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे कळताच, महाराष्ट्रातील हजारो युवकांनी आणि समाज धुरीणांनी पाठिंबा देत आहेत.  हजारो लोक उद्या पुण्याच्या दिशेने येण्याच्या तयारीत आहेत. समाजमाध्यमातून अनेकजण पाठिंबा देत आहेत.



सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता. त्यानंतर,लगेच मी सारथी च्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजुन घेतली आणि सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.


लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन त्या सर्वांचा उत्कर्ष करण्याची शिकवण माझ्या घराण्यातील पूर्वजांनी दिली आहे. आम्हाला सर्व जाती, सर्व समाज समान असल्याचे खासदार संभाजीराजे म्हणाले.


परंतु आज घडीला मराठा समाज हा अत्यंत विपरीत परिस्थितीतून वाटचाल करतोय. तो अडचणीत सापडलाय. महाराष्ट्रात मोठा भाऊ म्हणून ओळखला जाणारा, ग्रामीण समाज व्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा समाज सर्व बाजूनी पिछेहाटीच्या मार्गावर आहे. त्यांची बाजू कुणीतरी मांडलीच पाहिजे असेही ते म्हणाले.


मराठा समाजाचा आजपर्यंत केवळ राजकारणासाठी वापर झाला. त्यांच्या मूळ दुखण्याकडे राजकारणा पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. आरक्षणाचा लढा असेल, किंवा इतरही अनेक मागण्या असतील त्यासाठी मी जमेल तितके प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. आज सारथीसारखी अत्यंत उपयुक्त असलेली संस्था काही अधिकारी आणि काही झारीतील शुक्राचार्य मिळून किरकोळ स्वार्थासाठी बंद पाडत असतील, तिला बदनाम करण्याचा घाट घालत असतील तर ते आम्ही होऊ देणार नसल्याची टीका देखील त्यांनी केली.



अनेक दिवसांपासून मी याविषयी सर्व त्या स्तरावर पाठपुरावा करत आहे. पण निर्णय काही होताना दिसत नाही. म्हणून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग मी निवडला आहे. लोकशाही मार्गाने, शांतता पूर्वक कुठलाही कायदा हातात न घेता आम्ही हा लढा उभारणार असल्याचे खासदार संभाजीराजे म्हणाले.



चौकशी करुन निर्णय 


याप्रकरणी रितसर चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे संभाजीराजेंनी उपोषणाची घाई करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय.