ही कोणती पद्धत भांडण करण्याची? पिता पुत्रांनी कार चालकाच्या अंगावर सोडला कुत्रा
पार्किगच्या वादातून कार चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच पाळीव कुत्रा देखील अंगावर सोडण्यात आला. नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे.
Navi Mumbai Crime: नवी मुंबईत एक विचित्र घटना घडली आहे. पार्किंगवरुन झालेल्या वादातून पिता पुत्रांनी कार चालकाच्या अंगावर कुत्रा सोडला. कुत्र्याने चावा घेतल्यामुळ कार चालक गंभीर जखमी झाला आहे. पार्किंगवर वाद होवून घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विठ्ठल राक्षे (35) असे या घटनेत जखमी झालेल्या कार ड्रायव्हरचे नाव आहे. तर याप्रकरणी मंगेश मुळगावकर आणि त्यांचा मुलगा सौमिल मुळगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुत्र्याने हाताला चावा घेतला
नेरुळ सेक्टर-19ए मधील लेण्याद्री सोसायटीत परिसरात हा प्रकार घडला. सोसायटीच्या गेटवर काही वेळासाठी उभी असलेली कार काढण्याच्या वादातून लेण्याद्री सोसायटीत मुळगावकर पिता पुत्राने कार चालक विठ्ठल राक्षे याला बेदम मारहाण करुन त्याच्या अंगावर आपला पाळीव कुत्रा सोडला. कुत्र्याने देखील त्याच्या हाताला चावा घेऊन त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी मुळगावकर पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
या घटनेत जखमी झालेला विठ्ठल राक्षे (35) हा नेरुळ सेक्टर-19 ए मध्ये राहण्यास असून त्याचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास राक्षे हा आपल्या कारने सानपाडा येथील कार्यालयात जात होता. यावेळी त्याच्या मोबाईलवर फोन आल्याने राक्षे याने लेण्याद्री सोसायटीच्या गेट समोर आपली कार उभी केली. त्यानंतर तो कारमध्येच मोबाईलवर बोलत थांबला. याचवेळी लेण्याद्री सोसायटीत राहणारा मंगेश मुळगावकर हा समोरुन दुचाकीवरुन आल्यानंतर त्याने राक्षे याला सोसायटीच्या गेट समोरुन कार पुढे घेण्यास सांगितले. त्यावेळी राक्षे याने पाठीमागून जागा असल्याचे सांगून तिथून त्याला जाण्यास सांगितले ,यावरून वाद सुरू झाला आणि रूपांतर भांडणात झाले.
नवी मुंबईकरांची पार्किंगची समस्या लवकरच सुटणार
नवी मुंबईकरांची पार्किंगची समस्या लवकरच सुटण्याची शक्यता आहे. आता पालिका शहरामध्ये मोफत पार्किग उपलब्ध करून देणारय. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला जातोय. यापुढे पार्किंगसाठी उपलब्ध असलेली जागा वाहनचालकांना अॅपद्वारे आरक्षित करता येईल. हा आराखडा प्रत्यक्ष अमलात आल्यानंतर शहरातली वाहतुकीची समस्या दूर होईल, असा विश्वास पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केला.