चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : दुसरीही मुलगी झाली म्हणून बायको आणि नवजात मुलीला बापाने वाऱ्यावर सोडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. मुलीला हॉस्पिटलमध्ये सोडल्यानंतर मुलीचे वडील गायब झालेत. त्यामुळे चिमुरड्या मुलीचं आणि तिच्या आईचं भवितव्य अंधकारमय झालं.
  
उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमधील गोंडस मुलगी या जगात येऊन वीस दिवसही झालेले नाहीत. पण या मुलीच्या वाट्याला बाप असूनही पोरकेपणा आलाय. दुसरीही मुलगी झाली म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या या मायलेकींना मुलीच्या बापानं घरी नेण्यास नकार दिलाय. अंबरनाथच्या कुशीवली आदिवासी पाड्यावरील या मुलीला जन्मानंतर श्वास घेण्यास त्रास झाला. तिला १० दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण त्या दिवसापासून तिचा जन्मदाता बाप हॉस्पिटलकडं फिरकला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने या प्रकरणी पीडित महिलेच्या नवऱ्याशी संपर्क साधलाय. त्याने या मायलेकींना घरी नेलं नाही तर मनसे स्टाईलनं धडा शिकवू असा इशारा मनसेने दिलाय.


मुलगाच पाहिजे हा अट्टहासापोटी एक बाप त्याची कर्तव्य विसरलाय. एका चिमुरडीच्या वाट्याला अजाणतेपणी संघर्ष आलाय. वंशाचा दिवाच पाहिजे ही मानसिकता किती खोलवर रुजलीय हे या निमित्तानं अधोरेखित झालंय.