सात वर्षांच्या मुलाची हत्या करून संगीत शिक्षकाची आत्महत्या
सायंकाळी चालकाने घराचा दरवाजा ठोठावला. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना पाचारण केले असता हा प्रकार उघड झाला
ठाणे : ठाण्यामध्ये मुलाची हत्या करून वडिलांची आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडल्याचं उघडकीला आलंय. ठाण्यातल्या वाघबिळ परिसरात ही घटना घडलीय. शौमिक घोष असं या इसमाचं नाव आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या बहिणींच्या नावे एक चिठ्ठीही लिहिलीय. शौमिक यांची सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागलीय. निराशेत शौमिक यांनी आपल्या अवघ्या सात वर्षांच्या मुलाची गळा दाबून आणि उशीनं तोंड दाबून हत्या केली आणि त्यानंतर बोस यांनी स्वत:ला गळफास लावून घेतला... या प्रकरणी कासारवडली पोलीस अधिक तपास करत आहेत.
का केली आत्महत्या?
वाघबीळ येथील विजय इन्लेकव्ह सोसायटीत राहणारा शौमिक घोष (३९) संगीत शिक्षक होते. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्येत बुडाले होते. पहिल्या पत्नीच्या घटस्फोटानंतर दुसरी पत्नीही सोडून गेल्याने ते तणावग्रस्त होते. पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याने त्याने दुसरे लग्न केले होते. मात्र दोन ते तीन महिन्यांपूर्वी दुसरी पत्नी शौमिकला सोडून माहेरी गेली. यामुळे घरात शौमिकसोबत त्यांचा सात वर्षांचा मुलगा एकांश राहत होता.
मंगळवारी शौमिकची दुसरी पत्नी घरी येऊन पुन्हा घरात पाऊल ठेवणार नाही, असे सांगून निघून गेल्याने तो चिंताग्रस्त होता... त्यातच आर्थिक चणचण असल्याने त्याने कालच पत्नीचे दागिने बँकेत जमा केले होते. अखेर आज दुपारी मुलाची उशीने गळा दाबून हत्या केल्यानंतर शौमिकने गॅलरीतील हुकला गळफास लावून घेत आत्महत्या केली.
सायंकाळी चालकाने घराचा दरवाजा ठोठावला. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना पाचारण केले असता हा प्रकार उघड झाला, अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नासिर कुलकर्णी यांनी दिली.