Narhari Zirwal vs Gokul Zirwal in Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवारीच घोषणा केली आहे. एकीकडे जागावाटपाची चर्चा अद्याप सुरु असतानाच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पक्षाच्या दिंडोरीमधील जनसमान यात्रेदरम्यानच्या भाषणामध्ये पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. "दिंडोरीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील. नरहरी झिरवाळ दिंडोरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील," असं म्हणत तटकरेंनी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला. या घोषणेमुळे आता या मतदारसंघामध्ये बापविरुद्ध बेटा अशी थेट लढत होण्याची दाट शक्यता आहे.


थेट शरद पवार गटाकडून मागितली उमेदवारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटाच्या उमेदवाराला हजेरी लावली होती. यावेळेस गोकुळ झिरवाळ यांनी आपल्याला महाविकास आघाडीकडून उमेदवारी हवी असल्याचं थेट सर्वांसमोर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितलं होतं. मात्र गोकुळ झिरवाळ या बैठकीला कसे पोहोचले हे सांगतानाच त्यांचे वडील नरहरी झिरवाळ यांनी खोचक इशारा दिला. 


मुलगा शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला कसा पोहोचला?


गोकूळ झिरवाळ जयंत पाटीलांच्या कार्यक्रमाला उपस्थित कसे काय राहिले यासंदर्भातही त्यांच्या वडिलांनी सांगितलं. "त्याने सत्कार करू का असे विचारले होते मी म्हटलो सत्कार कर आणि निघून ये. हा गेला तर गेला याची आमदार होण्यापर्यंत मजल गेली तर कसं व्हायचं?" असा सवाल झिरवाळ यांनी केला. गोकूळ झिरवाळ यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली तर थेट अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा समाना होईल. अजित पवार गटाकडून वडील नरहरी झिरवाळ लढतील तर शरद पवार गटाकडून गोकूळ झिरवाळ निवडणुकीच्या रिंगणात असतील.


त्याने स्वतःच काहीतरी...


नरहरी झिरवाळ यांच्या मुलाने म्हणजेच गोकुळ झिरवाळ यांनी महाविकास आघाडीकडून उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबद्दल बोलताना, "राजकारणात प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे. त्याचे वय पाहता त्याने अजून खूप काही करणं गरजेचं आहे. मी दिलेल्या भांडवलावर लढण्यापेक्षा त्याने स्वतःच काहीतरी करावं. सगळंच बापाचं वापरून कसं चालणार?" अशी प्रतिक्रिया झिरवाळ यांनी नोंदवली. 


ते उद्योग करू नये...


दिंडोरीमध्ये बाप विरुद्ध मुलगा अशी नुरा कुस्ती होण्याची शक्यता आहे यावरही झिरवाळ यांनी खोचक शब्दामुळे मुलाचे कान टोचले. "त्याचा बाप ग्रामपंचायत सदस्यापासून वर जात गेला तेव्हा आमदारपर्यंत पोहचला. बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर तिथून सुरुवात करायला हवी. समजून घेण्यात 5 नाही तर 10 वर्ष जातात त्यामुळे त्याने ते (विरोधकांकडून लढण्याचे) उद्योग करू नये," असा खोचक टोला झिरवाळांनी त्यांच्याच लेकाला लगावला.