पुणे : एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासात पुणे पोलीस आता अमेरिकेच्या 'एफबीआय' या तपास संस्थेची मदत घेणार आहेत. या प्रकरणी तपासात आरोपी वरवरा राव यांच्याकडे आढळलेली हार्ड डिस्क  ताब्यात घेण्यात आलीय. मात्र, ही हार्ड डिस्क खराब झाल्याचं समोर आलंय. ती उघडण्यासाठी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात 'एफबीआय'ची मदत घेण्यात येणार आहे. नक्षलवाद्यांशी संबंध तसंच 'एल्गार परिषदे'च्या माध्यमातून कोरेगाव भीमा हिंसाचार घडवल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी तेलगु कवी वरवरा राव यांना अटक केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरवरा राव यांच्या घरातून पोलिसांनी एक हार्ड डिस्क ताब्यात घेतली होती. ही हार्ड डिस्क अगोदर पुण्याच्या लॅबमध्ये पडताळणीसाठी पाठवण्यात आली. त्यानंतर ती मुंबई, गुजरात आणि हैदराबादच्या फॉरेन्सिक लॅबलाही पाठवण्यात आली. परंतु, या हार्ड डिस्कमधील डाटा रिकव्हर करण्यात अपयश आलं. आता ही हार्ड डिस्क एफबीआयकडे पाठवण्याच्या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी मिळालीय. 



काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी वरावरा राव यांच्यासोबतच वकील सुधा भारद्वाज, मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यासह सुमारे दहा जणांना अटक केलीय. १ जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर तपासात 'एल्गार परिषदे'चं नाव चर्चेत आलं होतं. या हिंसाचाराच्या आदल्या दिवशी पुण्याच्या शनिवार वाड्यात 'एल्गार परिषदे'चं आयोजन करण्यात आलं होतं. यात काही माओवाद्यांचाही समावेश असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या परिषदे दरम्यान हिंसाचाराचा कट रचल्याचा पुणे पोलिसांचा संशय आहे.