विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : सतत होणारे चोरीचे आरोप आणि प्रत्येक वेळी पोलिसांकडून होणारी चौकशी याला कंटाळून एका तरुणानं अनोखी शक्कल लढवली. आपल्याला होणाऱ्या त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी तरुणाने केलेल्या प्रकाराची सध्या जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारही बाजूने ओसाड डोंगर आणि त्यामध्ये असणार हे घर, हे घर कुण्या नेत्याचं किंवा एखाद्या बड्या अधिकाऱ्याचं नाही. तरीही या घरावर चारही बाजूने सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे घर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलंय. आता तुम्ही म्हणाल घरावर सीसीटीव्ही लावले यात नविन ते काय. सीसीटीव्ही लावण्याचं कारण थोडसं वेगळं आहे.


कुटुंबाला पोलिसांचा त्रास 
गावात अथवा परिसरात एखादी गुन्हेगारी घटना घडली की सर्वात आधी या घरात राहणाऱ्या काळे कुटुंबाला लक्ष केलं जातं. परिसरात एखादा गुन्हा घडला की प्रत्येक वेळी या घरातील व्यक्तींची चौकशी होते आणि मग वारंवार पोलीस स्टेशनला बोलावलं जातं.  अनेक वेळा पोलिस घरापर्यंत वारंवार चकरा मारतात.


प्रत्येक वेळी आपण गुन्हा केला नाही, आपला गुन्ह्यात सहभागी नाही हे सिद्ध करावं लागतं. वारंवार असं घडत असल्यामुळे त्रासलेल्या या कुटुंबातील शामल काळे या मुलाने घराच्या चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत.


काळे कुटुंब थोडीफार असलेली शेती कसून आपला उदरनिर्वाह करत. तर शामल हा शिरूर इथल्या एका शाळेत दहावीचं शिक्षण घेत आहे. त्याची शिक्षणाची मोठी जिद्द, चांगलं शिक्षण घेऊन मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. मात्र वारंवार ज्या गुन्ह्यात सहभाग नाही. त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हे कुटुंब पुरते हतबल झालं आहे.


आपण कुठलाही गुन्हा केला नाही ह्याचा पुरावा देण्यासाठी आपण घरातून कधी गेलो कधी आलो याची माहिती ठेवण्यासाठी घरावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. आम्ही विशिष्ट जातीत जन्म घेतला म्हणून आमच्यावर गुन्हेगारीचा ठपका ठेवला जातो आम्हाला देखील समाजात इतरां प्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, अशी व्यथा भटके विमुक्त संघटनेचं समन्वयक अरुण जाधव यांनी मांडली आहे. 


या कुटुंबा प्रमाणेच समाजात अशी अनेक कुटुंब आहेत. की जे केवळ समाजातील विकृत मानसिकतेमुळे यात अडकून पडली आहे. त्यामुळेच समाज व्यवस्था आणि पोलीस प्रशासनाने देखील आपला दृष्टिकोन बदलन गरजेचं आहे